लखनौ : महाआघाडीचा कोणता नेता वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढणार हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. वाराणसी लोकसभा जागेसाठी उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांचे सरकार असताना मंत्री राहिलेल्या सुरेंद्र पटेल यांच्या नावाची चर्चा सध्या सुरु आहे. अनुप्रिया पटेल यांचा पक्ष 'अपना दल'चे वाराणसी भागात मोठे प्रस्थ आहे. त्यांच्या पक्षाची भाजपसोबत युती आहे. त्यामुळे या भागात अनुप्रिया पटेल यांच्या वर्चस्वाला टक्कर देणे सपासाठी कठीण काम असणार आहे. त्यासाठीच सुरेंद्र पटेलांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी होत आहे.


सपाच्या अनेक नेत्यांनी अखिलेश यांना सल्ला दिला आहे की, बनिया किंवा जायसवाल समाजाच्या नेत्याला वाराणसीतून लोकसभेचे तिकीट द्यायला हवे. तसेच राष्ट्रीय जनवादी पार्टीचे अध्यक्ष संजय चौहान यांचे नावदेखील पुढे आले आहे.

मतदार संघांची वाटणी केल्यानंतर वाराणसीची जागा सपाला मिळाली आहे. त्यामुळे अखिलेश यादव गेल्या काही दिवसांपासून वाराणसीच्या जागेवर कोणाला उमेदवारी द्यावी, याबाबत विचार करत आहेत. परंतु यादव यांना अद्याप एकही योग्य उमेदवार मिळालेला नाही. अखिलेश यादव या भागात जातीय समीकरणं मांडून उमेदवार ठरवू इच्छितात.

शुक्रवारी अखिलेश यांनी पक्षाच्या कार्यालयात एक बैठक बोलावली होती. या बैठकीत वाराणसीमधून कोणाला उमेदवारी द्यावी याबाबत तब्बल दोन तास चर्चा झाली. यावेळी खूप नेत्यांची नावे पुढे आली. परंतु एक-एक करुन अखिलेश यांनी सर्व नावे वगळली.