औरंगाबाद : शिवसेना-भाजपसाठी डोकेदुखी बनलेला जालन्याच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांनी जालन्यातून माघार घेतली आहेत. त्यामुळे भाजपकडून रावसाहेब दावने याठिकाणी रावसाहेब दानवेंचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


युतीच्या औरंगाबादमधील मेळाव्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत अर्जुन खोतकरांचं मतपरिर्वन करण्यात मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांना यश आलं आहे.


मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनी युतीचा धर्म समजून सांगितला. या धर्माप्रमाणे पहिली परीक्षा मी पास होईल. दुसरी परीक्षा तुमची आहे, तुम्हीही पास व्हा. आमच्या जिल्ह्यात आणीबाणी लागली होती, ती आज उठली, अशी प्रतिक्रिया अर्जुन खोतकर यांनी दिली आहे.


उद्धव ठाकरेंच्या निर्णयाच्या विरोधात मी गेलो नाही. मी कडवट शिवसैनिक आहे, दगाफटका करणार नाही. जी जबाबदारी टाकली आहे, ती जबाबदारी पार पाडू, असं आश्वासनही खोतरकांनी यावेळी दिलं.



रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांचा वाद कोणत्या मुद्द्यांवर मिटला असावा?


-  मार्केट कमिटीमधील गाळे विक्री करताना खोतकर यांनी घोळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हे प्रकरण रावसाहेब दानवे यांनी लावून धरले होते. हे प्रकरण मिटवण्यात यावे ही खोतकरांची मागणी होती, ती मान्य केल्याची माहिती मिळत आहे.


- अर्जुन खोतकर यांच्यावर तूर घोटाळ्याचे आरोप आहेत. या प्रकरणात अर्जुन खोतकर यांच्या 45 नातेवाईकांवर गुन्हे दाखल आहेत. ते सगळे जामिनावर आहेत. हे प्रकरण मिटवण्यात यावे.


- जालन्यातील रामनगर कारखान्याच्या जमीन खरेदी प्रकरण. रामनगर येथील कारखाना खोतकर आणि औरंगाबादमधील एक बांधकाम व्यवसायिक यांनी विकत घेतला आहे. यात घोटाळा झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात मदत करावी आणि प्रकरण मिटवावे.


- खोतकर यांच्या दर्शना हॉटेलच्या जागेचा वाद मिटवावा.


- विधानसभेसाठी दानवेंनी खोतकरांना मदत करावी आणि खोतकरांनी दानवे यांना लोकसभेसाठी युतीधर्म पाळावा.


- अर्जुन खोतकर यांनी विधानपरिषदेची उमेदवारी मागितली आहे. कारण त्यांना विश्वास नाही की रावसाहेब दानवे हे विधानसभेला मदत करतील. याशिवाय मागील निवडणुकीत केवळ सव्वादोनशे मतांनी विजय मिळाल्याने त्यांनी ही मागणी केली आहे.


वरील मुद्द्यावर चर्चा झाल्यानंतर रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यातील वाद मिटला असल्याचं बोललं जात आहे.