साऊथ अफ्रिका टुरिझम इंडियाने काही दिवसांपूर्वी एका विशेष सहलीचं आयोजन केलं होतं. हेतू असा की हा देश.. इथली जगण्याची पद्धत, इथली माणंस.. त्यांच्या सवयी.. निसर्ग आदी गोष्टींची माहीती लोकांना मिळावी. जोहान्सबर्ग, प्रिटोरिया, पोर्ट इलिझाबेथ, केपटाऊन व्हाया जंगलसफारी अशी आमची ट्रीप झाली.


या देशात गेल्यावर आपल्या लक्षात येतं की १९९४ नंतर खरंतर या देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्याआधी वर्णद्वेषाने हा देश ग्रासला होता. पण नेल्सन मंडेला यांचं नेतृत्व या देशाला मिळालं आणि या देशात जान आली. इंग्रजांचं राज्य संपुष्टात आलं. पण या देशाने त्यांच्या अनेक गोष्टी घेतल्या. त्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे तिथली स्वच्छता आणि शिस्त. खरंतर आपल्यात आणि दक्षिण अफ्रिकेतला फरक असा की आपल्या दोघांवर इंग्रजांनी राज्य केलं. पण त्यांच्याकडे असलेली शिस्त, स्वच्छता, नेटकेपणा आपल्याकडे येऊ शकला नाही. कारण याचं कारणही इंग्रज हेच आहेत. आपल्याकडे इंग्रज आले ते राज्य करायला. पण तिकडे त्या देशाकडे त्यांनी पाहिलं ते आपलं घर म्हणून. म्हणूनच तिथली घरं.. रस्ते.. जास्त नीटस आहेत. एक महत्वाची बाब अशी की तिथल्या लोकांनी हे वैविध्य जपलंही आहे.

जोहान्सबर्ग ही त्यांची राजधानी जरी मानली जात असली तरी प्रिटोरिया हा त्यांची शासकीय राजधानी मानली जाते. म्हणजे, साऊथ अफ्रिकेच्या अध्यक्षांचं घर, कार्यालय आदी गोष्टी तिथेच आहेत. त्या अध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर असलेल्या बागेत मंडेलांचा मोठा पण तितकाच देखणा पुतळाही आहे. हा पुतळा जणू आपल्याला आपण सगळे एक असून, एकत्र पुढे जाण्याबद्दल सुचवत असतो.

साऊथ अफ्रिका म्हणजे डोळ्यासमोर काय येत? तर सगळ्यात समोर येतं ते बंजी जंपिंग. ब्लू कान्स नदीवर असलेल्या २१६ मीटर पुलावरून यात दरीच्या दिशेने उडी मारणं हा प्रकार केवळ थरकाप उडवणारा आहे. शिवाय, शिवाय इथे वाळूतूक करायचं स्किइंग असतं. इथे सर्फ ड्रायव्हिंगही आहेच. म्हणजे, ओल्ड स्पाइसच्या जाहिरातीत समुद्राच्या लाटांवर स्वार होणारा तो तरूण आठवतोय? त्याला सर्फ ड्रायव्हिंग म्हणतात. ते वरवर सोपं वाटत असलं तरी असं कमालीचं अवघड. अशा अनेक घाडसी खेळांचा साऊथ अफ्रिका हा माहेर असलेला देश आहे. इथला निसर्ग तर कमाल आहेच. पण त्याची योग्य ती काळजीही इथल्या मंडळींनी घेतली आहे. कारण इथे होणारे थरारक खेळ हे अत्यंत सुरक्षित असतात हे विशेष.

बंजी जंप आणि तिथला थरार
साऊथ अफ्रिकेत गेल्यानंतर तिथे बंजी जंप न करणं म्हणजे, कोल्हापुरात जाऊन मिसळ न चाखण्यासारखं आहे. म्हणूनच जगातल्या सगळ्यात उंच असलेल्या ब्लू कान्स नदीच्या पुलावरून खोल दरीत उडी मारण्याचा अनुभव घ्यायलाच हवा. अर्थात सर्वात सुरक्षित जंपिंग म्हणून त्या खेळाची नोंद आहेच. तिथे आजवर एकही अपघात झालेला नाही. तिथे येणाऱ्याची पूर्ण काळजी घेतली जाते. आपण नेमकी कशी उडी मारायची आहे याचं प्रात्यक्षिक दाखवलं जातं. विशेष बाब अशी की तिथल्या अनेकांना हिंदी येते. त्यांना आपली गाणी माहीती आहेत. अत्यंत अदबीने ते आपल्याशी बोलत असतात. आणि आपलं रीतसर रजिस्ट्रेशन झालं की आपलं वजन, वय आदी गोष्टींची नोंद करून घेतली जाते आणि आपला नंबर आपल्या हातावर स्केचपेनने लिहिला जातो. मग आपण कूच करतो त्या पुलाकडे. २१६ मीटर्स वरून खेल दरीत उडी मारण्यासाठी त्या नदीच्या पुलावरून पुलाच्या मधोमध असलेल्या जंपिंग स्पॉटपर्यंत आपल्याला चालत पोचावं लागतं. अर्थात तिथेच पोटात गोळा येतो. तिथे येईस्तोवर लोकांना येणाऱ्या टेन्शनची पुरेशी कल्पना आयोजकांना असते. म्हणूनच हा स्पॉट असतो एकदम थ्रिलिंग. तिथे सतत गाणी वाजत असतात. वातावरण पूर्ण चार्ज झालेलं असतं. आणि मग त्यानंतर जे काही होतं ते केवळ अवर्णनीय. आयुष्यात एकदातरी अनुभवावा असा हा प्रकार आहे.

जंगल सफारी
अफ्रिकेत गेल्यानंतर बिप ५ पाहाणं ही एक पर्वणी असते. जिराफ, झेब्रा, गेंडा, ह्त्ती, सिंह या जंगलात असतात. आपल्याकडे कशी अभयारण्य आहेत तशीच ती इथेही आहेत. पण आपल्यापेक्षा कितीतरी पटींनी मोठी. विस्तीर्ण. शिवाय त्याची मालकी ही खासगी असते. त्या जमीन मालकाची ती जमिन अक्षरश: शेकडो एकर असते. त्यावर या लोकांनी हे जंगली जीवन वसवलं आहे. आम्ही तिथे गेलो होतो ते इन्क्वेन्क्वेझा या रिसॉर्टवर. आम्ही तिथे सिंह, झेब्रा, हरिण पाहीलं. पण जिराफ, ह्त्ती आणि गेंडा काही दिसला नाही. त्याबाबतीत आम्ही कमनशिबी ठरलो. पण इतरांना तसा अनुभव येईलच असं नाही. मूळ जंगलाला, तिथल्या झाडीला कोणतीही इजा न पोचवता तिथे हे जंगल वसवलं आहे. प्राण्यांची पूर्ण काळजी तिथे घेतली जाते.

उंची हॉटेल्स आणि चविष्ट खानपान
या दहा दिवसांच्या मुक्कामात साऊथ अफ्रिका टुरिझम इंडियाने रहायची आणि खानपानाची उत्तम व्यवस्था केली होती. वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असलेली उंची पंचतारांकित हॉटेल्स.. त्यात मिळणारं उत्तम जेवण हे त्याचं उदाहरण होतं. साऊथ अफ्रिकेला निसर्ग सौदर्याचं अमाप वरदान लाभलेलं आहे. त्याचा पुरेपूर उपयोग साऊथ अफिका टुरिझमने करून घेतला आहे. सौदर्याची उत्तम जाण आणि व्यावसायिता यांचा मिलाप इथे पाहायला मिळतो. शिवाय हर्ले डेव्हिडसनची राईड, हेलिकॉप्टर राईड अशा अनेक गोष्टी तिथे आहेत. ज्याचा आस्वाद घेता येतो. आपण सतत युरोपीय देश फिरत असतो. पण थोडा ब्रेक घेऊन साऊथ अफ्रिकेला जायला हरकत नाही. तिथेही खूप काही पाहण्यासारखं आहे यात वाद नाही.

व्हिडीओ :