मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारतोफा जोमाने धडाडू लागल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांचे नेते जोरदारपणे प्रचाराच्या मैदानात उतरले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीयमंत्री अमित शाह यांच्यासह दिग्गजांची फौज महाराष्ट्रात प्रचारसभा घेत आहेत. एमआयएम पक्षानेही छत्रपती संभाजीनगरसह मुंबई, सोलापूर आणि काही ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. त्यासाठी, प्रचाराला वेग आला असून एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी जाहीर सभा घेत प्रचाराला सुरुवात केली आहे. मुंबईतील कुर्ला मतदारसंघातील एमआयएमच्या उमेदवार आसमा शेख यांच्यासाठी असदुद्दीन ओवैसी (Asaduddin owaisee) यांची जाहीर सभा झाली, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी व महायुतीमधील नेत्यांवरही हल्लाबोल केला. मुंबईतील सभेतून मुस्लीम समुदायाच्या प्रश्नावर भाष्य करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही टीकेची झोड उठवली. वक्फ बोर्ड आणि बाबरी मस्जीदच्या मुद्द्यावरुन मुस्लीम समाजाला आवाहन केलं.

  


ओवैसी यांनी कुर्ला येथील मतदारसंघात बोलताना म्हटले की, एक आमदार आणि एक नगरसेवक या ठिकाणी निवडणूक लढत आहेत. एक शिंदेंचा आणि उद्धव ठाकरे यांचा एक उमेदवार आहे, त्यांनी मुस्लिम समाज स्मशान भूमीसाठी जाणारा रस्ता बंद केला. आता कुर्ला नेहरूनगरवरून जाण्यासाठी आपल्या लोकाना 3 किलोमीटर चक्कर मारावी लागत आहे. हे साफ चुकीचं आहे. लहान मुलं या रस्त्याने जात होते, मात्र आमदार आणि नगरसेवक यांनी ठरवून रस्ता बंद केल्याचे सांगत ओवैसी यांनी स्थानिक मुद्यांना हात घातला. त्यानंतर, केंद्र सरकारने आणलेल्या वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसी यांनी केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केलं. तसेच, शिवसेना ठाकरे गटानेही या विधेकायावेळी घेतलेल्या भूमिकेवरुन टीका केली.  


नरेंद्र मोदी सरकारने वक्फ बिल आणलं आहे, हा कायदा पास झाला तर मशीद राहणार नाही, दर्गांवर कब्जा केले जातील. जमिनी ताब्यात घेतल्या जातील. आपल्याला या कायद्याच्या विरोधात मतदान करायचं आहे, भाजप आणि शिंदे यांची इच्छा आहे, मशीद नष्ट व्हायला हव्यात. जमिनी ताब्यात घेतल्या जातील, त्यांच एकच ध्येय आहे वक्फची प्रॉपर्टी ताब्यात घेणं. पण, याचा मालक अल्ला आहे, त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायची आहे, अशा शब्दात ओवेसी यांनी वक्फ बोर्ड विधेयकावरुन महायुती व केंद्र सरकारला लक्ष्य केलं. वक्फ वाचवणं नाही तर वक्फ संपवणं हेच यांचं काम आहे. वक्फ बोर्डात मुस्लिम व्यतिरिक्त सदस्य त्याठिकाणी बसवायचे आहेत. टीव्ही मीडियात काम करणारे लोक म्हणतात की, ओवैसी खोटं बोलतं आहे. मात्र, त्यांचा याचा अभ्यास नाही, आता यांनी जिल्हाधिकारी यांना अधिकार दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने तक्रार केली तर 100 वर्ष जुन्या मशिदी सरकारकडे जातील. एक बाबरी मशीद आपण हरवलो आहे, आता आणखी किती हरवणार आहोत, असा शब्दात ओवैसी यांनी वक्फ बोर्ड विधेयकावरुन सरकारवर हल्लाबोल करत मुस्लिमांना आवाहन केलंय. 


देवेंद्र फडणवीसांवरही जोरदार हल्लाबोल


दरम्यान, आता मुद्दा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे, ज्यावेळी वक्फ बोर्ड मुद्दा संसंदेत आला त्यावेळी ठाकरेंचे खासदार कँटीनमधे बसून चहा पित होते. देवेंद्र फडणवीस यांना स्वप्नात ओविसी दिसत आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले हैदराबाद वापस जा, पण देवेंद्र संपूर्ण भारत माझा आहे, त्यानी मला सांगू नये मी कुठ जावं असे म्हणत ओवैसी यांनी देवेंद्र फडणवीसांनाही लक्ष्य केलं. 


हेही वाचा


भुजबळांनी मर्यादा शिल्लक ठेवल्या नाहीत; येवल्यातून शरद पवारांचा हल्लाबोल, अजित पवारही लक्ष्य