अहिल्यानगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मानखुर्द शिवाजीनगरचे उमेदवार नवाब मलिक यांच्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. नवाब मलिक यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीला प्रतिवादी करत  सॅमसन अशोक पाथरे या व्यक्तीनं  हायकोर्टात धाव घेतल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात अजित पवार यांना पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी याबाबत एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले मी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन बोलतो. तर, नवाब मलिक यांनी या प्रकरणातील कायदेशीर बाबी तपासून उद्या भूमिका जाहीर करणार असल्याचं म्हटलं. 


अजित पवार काय म्हणाले?


अजित पवार श्रीरामपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार लहू कानडे यांच्या प्रचारासाठी दाखल झाले होते. यानंतर ते श्रीरामपूरहून शिर्डी विमानतळाकडे निघाले होते. त्यापूर्वी पत्रकारांनी त्यांना नवाब मलिक यांच्याबाबत प्रश्न विचारला. यावर त्यांनी नवाब मलिक यांच्या विरोधातील याचिकेबाबत माहिती घेऊन बोलेन असं म्हटलं. त्यानंतर ते श्रीरामपूरहून शिर्डी विमानतळाकडे रवाना झाले.  


नवाब मलिक उद्या भूमिका मांडणार


नवाब मलिक यांनी या प्रकरणात कायदेशीर बाबींची माहिती घेऊन  बाजू उद्या सकाळी मांडणार असल्याचं म्हटलं आहे. 



नबाव मलिकांचा जामीन रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका


वैद्यकीय कारणांसाठी दिलेल्या अंतरिम जामीनाचा नवाब मलिकांकडून गैरवापर होत असल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. ईडीनं दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांनी मुंबई उच्च न्यायालयात नियमित जामिनासाठीची याचिका दाखल केली आहे. मात्र, प्रकृती अस्वस्थ्यांमुळे सर्वोच्च न्यायालयानं नवाब मलिकांना तात्पुरता वैद्यकीय जामीन दिला आहे.  सॅमसन अशोक पाथरे  या व्यक्तीनं ईडीला प्रतिवादी करत याचिका दाखल केली आहे.


सर्वोच्च न्यायालयाचा हा जामीन हायकोर्ट मलिकांच्या जामीन अर्जावर निकाल देत नाही तोपर्यंत कायम राहिलं असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे. जामीन मिळाल्यानंतर नवाब मलिक सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत.


नवाब मलिक सध्या शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेनं त्यांना पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय शिवसेनेनं सुरेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे. भाजपनं सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं म्हटलं होतं.  नवाब मलिक यांनी देखील महायुतीचा उमेदवार नसून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असल्याचं म्हटलं होतं.


दरम्यान, नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक या अणूशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढत आहेत. 


इतर बातम्या : 


Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा