छत्रपती संभाजीनगर: राज्यभरात सध्या विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhan Sabha Election) तयारी सुरु आहे. सर्वंच राजकीय पक्षांकडून राजकीय प्रचार सुरु करण्यात आला आहे. याचदरम्यान छत्रपती संभाजीनगरमधील एक महत्वाची घडामोड समोर आली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरात आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. वैजापूर तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक बाळासाहेब संचेती (Balasaheb Sancheti) यांच्या घरी, बँकेवर आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. बाळासाहेब संचेती वैजापूर को-ऑपरेटिव्ह मर्चंट बँकेचे संचालक आहेत. तसेच शहरात विक्रम सुराणा यांच्या घरी देखील छापेमारी सुरु असून विक्रम सुराणा हे बाळासाहेब संचेती यांच्या बहिणीचा मुलगा आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार दिनेश परदेशी यांचे निकटवर्तीय म्हणून बाळासाहेब संचेती यांची ओळख आहे. त्यामुळे या छापेमारीला राजकीय किनार असल्याची देखील सध्या चर्चा रंगली आहे.
पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई-
पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने ऑक्टोबरपासून कारवाईत 96 वाहनांसह 3 कोटी 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एका महिन्यात 923 गुन्हे नोंदवण्यात आले असून, 843 जणांना अटक करण्यात आली आहे. एक ऑक्टोंबर पासून निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर विविध पथके तयार करण्यात आली आहेत. जिल्ह्यात एकूण 18 तात्पुरते चेकनाके उभे करण्यात आलं असुन निवडणुकीच्या संदर्भात कसून तपासणी केली जात आहे.
53 किलो चांदी, सोन्याची बिस्किटं, अहिल्यानगरमध्ये 23 कोटींचे दागिने जप्त
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू संबंधित कारवाई केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील सुपा टोलनाक्यावर तैनात असलेल्या पथकाने 23 कोटी 71 लाख रुपयांचे सोने, चांदी, हिरे, मोत्याचे दागिने पकडले आहेत. या दागिन्यांचा पंचनामा करून इतर कार्यवाही करून दागिने आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईत चांदीची चाळीस किलोची वीट, सोन्याची बिस्किटे, तर एकूण 53 किलो चांदी, हिरे-मोत्यांचे दागिने ताब्यात घेतले आहे. तपासणीत 14 अधिकृत पावत्याही आढळून आल्या. तर वाहनासोबत असलेल्या वाहतूक कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे मौल्यवान वस्तूंची वाहतूक करण्याचा परवाना नव्हता. सुपा पोलिसांनी गोल्ड व्हॅल्युअर आणि कंपनीच्या प्रतिनिधींसमोर या संबंधीचा 15 पानांचा पंचनामा केला आहे.
संबंधित बातमी:
पुणे, पालघरनंतर आता उल्हानगरमध्येही मोठं घबाड; संशयित कारवर भरारी पथकाचा छापा