मुंबई : उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर राज्यातील लढतींचं चित्र स्पष्ट झालं.. कुठे बंडखोरांची समजूत काढण्यात पक्षाला यश आलं. तर कुठे बंडखोरांनी कोणाचंही न ऐकता मैदानात पाय रोवून उभा राहायचं ठरवल्यानं लढती रंगतदार बनल्या. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी काही ठिकाणी चांगलाच ड्रामा पाहायला मिळाला. कोल्हापूरमध्ये सतेज पाटील (Satej patil) यांनी नाराजी व्यक्त करत काँग्रेस उमेदवाराने उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर संताप व्यक्त केला. तर काही ठिकाणी मेलो ड्रामाही पाहायला मिळाला, माहीममधील शिवसेना उमेदवार सदा सरवणकर हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थ बंगल्यावर गेले होते. मात्र, सदा सरवणकर (Sada sarvankar) यांना राज ठाकरेंनी भेट नाकारली. त्यानंतर, सरवणकर यांची उमेदवारी कायम झाली असून माहीममध्ये तिरंगी लढत होणार आहे.
राज्यातील 288 मतदारसंघ 8272 उमेदवार मैदानात असून आज दिवसभरात 983 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. तर, निवडणूक आयोगाने 1654 उमेदवारांचे अर्ज फेटाळले आहेत. त्यामुळे, आज अंतिम लढती निश्चित झाल्या असून कोल्हापूरमध्ये उत्तरमध्ये मोठ्या नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. राज्यात कुठे पक्षातील बंडखोरांनी अर्ज कायम ठेवला, कुठे मित्र पक्षांतील उमेदवारासोबत लढायची वेळ आली त्यावर एक नजर टाकुयात.
समीर भुजबळ, नांदगाव
हीना गावित, अक्कलकुवा
गीता जैन, मीरा रोड
ज्योती मेटे, बीड
गायत्री शिंगणे, सिंदखेड राजा
देवळाली -राजश्री आहेर (शिवसेना)
पक्षातील आणि मित्र पक्षातील बंडखोरांमुळे महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडे डोकेदुखी वाढली आहे. मविआतील अशा बंडखोरांना आदित्य ठाकरेंनी सज्जड दम दिलाय तर फडणवीसांनी बंडखोर अधिकृत उमेदवारामागे उभे राहतील असा आशावाद व्यक्त केला आहे. राजकीय पक्षांना बंडखोरीचं टेन्शन राहणार असलं तरी काही ठिकाणी मात्र बंडखोरी शमवायला यश आलंय.
या ठिकाणी बंडखोरी शमवण्यात यश
बोरिवली - गोपाळ शेट्टी
पिंपरी चिंचवड - नाना काटे
अणुशक्तीनगर- सना मलिक- अविनाश राणे (शिवसेना)
दिंडोरी- नरहरी झिरवाल- धनराज महाले (शिवसेना)
उदगीर- संजय बनसोडे- दिलीप गायकवाड ( भाजप)
या मतदारसंघात मैत्रिपूर्ण लढत होणार
सांगोल्यामधे मैत्रीपूर्ण लढत - दीपक आबा साळुंखे, शिवसेना ठाकरे, डॉ. बाबासाहेब देशमुख, शेकाप विरुद्ध महायुतीकडून शहाजी बापू पाटील
रायगड अलिबाग - चित्रलेखा पाटील (शेकाप), राजा ठाकूर (काँग्रेस), सुरेंद्र म्हात्रे उबाठा शिवसेनेत होणार मैत्रीपूर्ण लढत
पुरंदर - अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे संभाजी झेंडे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे विजय शिवतारे यांची उमेदवारी कायम.
दरम्यान, या वेळची निवडणूक अतिशय अटीतटीची आणि अनेकांसाठी अस्तित्वाची आहे, यात शंका नाही. कोणत्याही एका पक्षाला भरभरुन जागा मिळतील अशी शक्यता कमीच आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपल्या मतांची मोट बांधण्याचे आणि विरोधकांच्या मतांचं विभाजन करण्याचे प्रयत्न करताना दिसतोय. अर्ज मागे घेणे, किंवा कायम राखत बंडखोरी करणे हा त्याच रणनीतीचा एक छोटासा भाग आहे. याचा लाभ कुणाला किती होतो ते पुढील 19 दिवसात कळेलच