Maharashtra Vidhan Sabha Election 2024: छत्रपती संभाजीनगरमधील पैसे वाटतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सदर व्हिडीओ समोर आणला आहे. पश्चिम मतदार संघातील एका तांड्यावर मतदाराला प्रत्येक मतासाठी पाचशे रुपये वाटत असल्याचं आलं समोर आलं आहे. देवळाई तांडा येथे माजी नगरसेवकाकडून पैसे वाटप झाल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे. तसेच पोलिसांच्या देखरेखीत पैसे वाटप झाल्याचा आरोपही अंबादास दानवेंनी केला आहे. या प्रकरणाबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती देखील अंबादास दानवे यांनी दिली. 


अंबादास दानवेंनी समोर आणलेल्या व्हिडीओमध्ये नेमकं काय?


अंबादास दानवेंनी समोर आणलेल्या व्हिडीओमध्ये पाच ते सहाजण दिसून येत आहे. यामध्ये देवळाई तांडा येथे माजी नगरसेवक असल्याचं देखील दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तुमची किती मते..8 मतं तर हे घ्या 4 हजार रुपये...असं संभाषण होताना दिसत आहे. तसेच सदर प्रकार पोलिसांच्या उपस्थितीमध्ये झाल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. पैसा वाटपाचा हा व्हिडीओ निवडणूक आयोगाला देखील देणार असल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलं आहे. 


बोटाला शाई लावून 1500 रुपये वाटले-


विधानसभा निवडणुकीत एका मतासाठी मतदारांना दीड हजार रुपये दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आला आहे. एक हजार देऊन आधार कार्ड आणि मतदान कार्ड जमा करून घेतले जात होते. तसेच मतदानाच्या दिवशी 500 रुपये देऊन बोटाला शाई लावून मतदान कार्ड परत घेऊन जायचे असा हा सर्व प्रकार असल्याचे आरोप केले जात आहे. सदर प्रकरणी जवाहरनगर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर हा सर्व प्रकार संजय शिरसाट यांच्याकडून केला जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. तसेच संजय शिरसाठ यांच्या फोननंतर पोलिसांनी दोन कोटी रुपये सोडून देण्यात आल्याचा आरोप देखील दानवे यांनी केला आहे. तर सदर प्रकरणावर शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी देखील प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळले आहेत. एबीपी माझाशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, पराभव जवळ दिसू लागल्याने पायाखालची वाळू सरकल्याने असे बिनबूडाचे आरोप विरोधक करत आहेत.




संबंधित बातमी:


Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मतदानकार्ड जमा केले, बोटाला शाई लावून 1500 रुपये वाटले; विरोधकांचा आरोप, छत्रपती संभाजीनगरमध्ये काय घडतंय?