Financial Management: महिन्याचा शेवटचा आठवडा म्हणजे अनेक नोकरदारांसाठी 'कडकी' ठरलेली. आहे त्या पगारात घरासह स्वत:चे खर्च वाढता वाढता वाढे..म्हणत शुन्यावर येतात आणि आर्थिक नियोजन गोंधळते. अनेकदा करियरच्या सुरुवातीला सेव्हिंग करणं आपण विसरतो. पण आर्थिक नियोजन कसं करायचं हे अनेकदा कळत नाही. पगाराचा योग्य वापर न करता गोंधळ उडत असेल तर बचत करण्याविषयीची ही ७ सुत्र तुम्हाला माहिती असायलाच हवीत.


पगार आला की आधी बचत  बाजूला काढा


कुठल्याही नोकरदाराला पगाराचा दिवस हा दिलासा देणारा असतो. महिन्याच्या शेवटी थकलेले पैसे, पैसे नसल्यानं रखडलेली कामं पगारानंतर केली जातात. पण इथूनच सुरु होते आर्थिक गुंतवणूकीचा गोंधळ. त्यामुळं पगार झाला की आधी बचतीची रक्कम बाजूला करणं हा नियम अंगवळणी पाडणं गरजेचं असल्याचं अनेक तज्ञ सांगतात. त्यामुळे ठरावीक एक रक्कम बाजूला राहते. आणि गुंतवणूक वाढते.


पगाराच्या किती टक्के गुंतवणूक असावी?


तुमच्या पगाराला तीन भागात विभागणं गरजेचं आहे. पगारातली ५० टक्के रक्कम ही तुमचे दैनंदिन खर्च भागवण्यासाठी असावी. ३० टक्के ही बचतीसाठी आणि राहिलेली २० टक्के लक्झरीसाठी किंवा मजा करण्यासाठी असायला हवी. बजेट सांभाळण्याचा हा सर्वोत्तम फॉर्म्यूला असल्याचं तज्ञ सांगतात.


कार घेण्याचा विचार करत असाल तर...


आपल्या दाराबाहेर स्वत:ची कार असावी असं अनेकांचं स्वप्न असतं. पण कार खरेदी करताना बजेटवर परिणाम होऊ नये याची काळजी कशी घ्यायची. २० टक्के डाऊन पेमेंट आणि कर्जाचा ४ वर्षांचा कालावधी अशी तजवीज असायला हवी. यात १० टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम EMI मध्ये जाऊ नये याची काळजी घेत कार खरेदी करणं चांगल्या बजेट प्लॅनिंगचा भाग असल्याचं सांगितलं जातं.


सुरक्षेची तरतूद किती करावी?


आपल्या प्रियजनांच्या सुरक्षेची तरतूद करणं सध्याच्या काळात अतिशय गरजेची असल्याचं तज्ञ सांगतात. तुमच्या पगाराच्या १० पट आयुर्विमा आणि वैद्यकीय विमा घेणं आवश्यक आहे.


कर्जाचा डोंगर वाढवू नका


कोणतंही कर्ज किंवा कर्जाचा हफ्ता ३० टक्क्यांपर्यंत असावा. गृहकर्जाचा कालावधी कमी ठेवावा म्हणजे व्याज कमी भरावे लागेल असं तज्ञ सांगतात.


सगळी गुंतवणूक एकाच ठिकाणी करू नका


जर इक्विटी आणि म्यूच्यूअल फंडात गुंतवणूक करत असाल तर २० ते ३० टक्क्यांपेक्षा अधिक गुंतवणूक करू नका. तुमची गुंतवणूक विभागून करा. एकाच ठिकाणी सगळी गुंतवणूक  न करण्याचा सल्ला तज्ञांकडून दिला जातो.