Supriya Sule Maharashtra Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) प्रचाराचे अवघे काही तास शिल्लक असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या अध्यक्ष सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी काल संगमनेरमध्ये जाहीर सभेला हजेरी लावली. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिर्डी येथे झालेल्या सभेत बाळासाहेब थोरात यांच्याकडे नेतृत्व देण्याचं वक्तव्य केलं होतं. त्यापाठोपाठ आज सुप्रिया सुळे यांनी देखील संगमनेर तालुक्यातील जनतेला संबोधित करताना तुमच्या मनात जे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं...अशी माझी देखील इच्छा, असं वक्तव्य केल्याने बाळासाहेब थोरात यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेला सुरुवात झाली आहे.


सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?


आज मी प्रचाराच्या नव्हे तर जल्लोषाच्या सभेसाठी आले आहे. बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्व उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहेआणि तुमच्या मनात जे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं अशी माझी देखील इच्छा आहे. महाराष्ट्राला एक सुसंस्कृत नेतृत्वाची खरच गरज आहे. मी आत्ताच बाळासाहेबांच्या कानात सांगितलं 2029 ला इथलं तिकीट आम्ही बदलणार आहे. (जयश्री थोरात यांच नाव घेत केलं वक्तव्य )  मला नाही वाटत बाळासाहेबांना ते आवडला असावं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.


शरद पवार आधी बाळासाहेब थोरातांनाच फोन करत होते- सुप्रिया सुळे 


जेव्हा जेव्हा मी बाळासाहेबांना भेटते तेव्हा आदर्श मोठा भाऊ कसा असावा हे समजतं. महाविकास आघाडी सरकार असताना देखील काहीही समस्या झाली तर पवारसाहेब आधी बाळासाहेबांनाच फोन करत होते आणि त्यानंतर प्रश्न सुटतो. आता त्यांना मतदान का करावं तर ते सुसंस्कृत आहेतच, मात्र आपलं सरकार आल्यावर त्यांच्यावर मोठी जबाबदारी पडणार हे नक्की ( जनतेतून मुख्यमंत्री झाले पाहिजे असा आवाज ) तुमच्या मनातलं स्वप्न पूर्ण कर हे साईबाबा आणि माझ्या पांडुरंगाला देखील सांगेल. त्यासाठी केवळ घोषणा नाही द्यायच्या इथे पण मतदान करा आणि सासरी देखील सांगा महाविकास आघाडीला मतदान करा...बाळासाहेब तुम्हाला विनंती आहे आपलं सरकार आल्यावर अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली.


बाळासाहेब थोरात काय म्हणाले?


आज या ठिकाणी प्रचाराला येताना आपल्या काही कार्यकर्त्यांना मारहाण झाली. काही लोकांना संगमनेरात अशांतता निर्माण करायची आहे...ज्याने कोणी हे केलं त्याचा पक्का बंदोबस्त पोलिसांनी करावा नाहीतर आम्हाला करावा लागेल...त्यांना सापडणे अवघड नाही. पुरा कार्यक्रम करून टाकू सांगायची गरज नाही...आमच्या कार्यकर्त्याला मुक्का मार लागला आहे. चार दिवसात बरा होईल पण तुमचा असा कार्यक्रम करू आयुष्यभर लक्षात राहील, असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला. तसेच इथला पालकमंत्रीच इथलं वातावरण कसं बिघडेल यासाठी प्रोत्साहन देतो, असा आरोपही बाळासाहेब थोरात यांनी केला.


समृद्धीवर जायच्याआधी काट्या कुपट्याने पळत होते- बाळासाहेब थोरात


मी नवव्यांदा निवडणुकीला सामोरे जातोय...आत्ता ताई म्हटल्या 29 ला तिकीट बदलायचे.. मात्र मी खरं सांगतो माझी यावेळेस बिलकुल इच्छा नव्हती... दिल्लीतल्या मंडळींना देखील हे बोललो होतो... मात्र तिथून मला सांगण्यात आलं यावेळेस तुम्हाला सोबत राहावं लागेल. का सांगत होते मला माहित नाही...कारण मी सगळ्यांना घेऊन चालतो आमदारांनाही सांभाळतो. सर्वांचा मेळ घालतो...असा माणूस पाहिजे असेल कदाचित त्यांना...दिल्लीने सांगितलं म्हणून मी उभा आहे नाहीतर फॉर्मसह आमच्या दुसऱ्या उमेदवाराच्या तयारी झाल्या होत्या, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले. आपला तालुका शांतता प्रिय आहे. हे बदलवण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहे. काहीजण भाषण करत करत चालले होते. मात्र धांदरफळमध्ये एक जण डोक्यावर आपटला. डोक्यावर आपटला कळालं ना तुम्हाला. त्या सभेत भाषण सुरू असताना नेते हसत होते. आमच्या महिला व तरुणांना सहन झालं नाही. त्या दिवशी नेताच पळाला तर कार्यकर्त्यांची काय अवस्था झाली असेल. समृद्धीवर जायच्याआधी काट्या कुपट्याने पळत होते आणि आता म्हणतात कार्यकर्त्याला काही झालं तर मी आहे. मग त्यावेळेस काय केलं तू?, जाऊद्या ते आपल्याला आपल्या तालुक्याचे राजकारण आणि संस्कृती टिकवायची आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. 


संबंधित बातमी:


Sharad Pawar : 'असं पाडा की महाराष्ट्रभर संदेश गेला पाहिजे, सगळ्यांचा नाद करायचा; शरद पवारांचा नाही'