बीड : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे (Pankaja munde) , प्रीतम मुंडे यांच्यानंतर मुंडे घराण्यातील तिसरी कन्या यशश्री मुंडे या देखील राजकारणात सक्रीय होत आहेत. यंदा बीडमधील (Beed) वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात त्या उतरल्या आहेत. वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव बँकेच्या निवडणुकीनिमित्त यशश्री मुंडे यांनी शुक्रवारी अर्ज दाखल केला आहे. यानिमित्ताने यशश्री मुंडे या राजकारणात सक्रिय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशातच वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेले प्रीतम आणि यशश्री मुंडे यांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच शिवसेना शिंदे गटाकडून देखील अर्ज दाखल करण्यात आला आहे.
वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 10 ऑगस्टला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच यशश्री मुंडे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. आज अर्ज छाननी प्रक्रिया पार पडली. ज्यात यशश्री आणि प्रीतम मुंडे या दोघींचाही अर्ज वैध ठरला आहे.
मुंडे बहिण भाऊ एकत्र आल्यानंतर वैद्यनाथ बँकेची ही पहिलीच निवडणूक
पुढे आलेल्या माहितीनुसार, वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या 17 जागांसाठी निवडणूक होत असून 71 अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज छाननी प्रक्रियेसाठी संचालक मंडळ बीडमध्ये उपस्थित राहिले. दरम्यान मुंडे बहिण भाऊ एकत्र आल्यानंतर वैद्यनाथ बँकेची ही पहिलीच निवडणूक पार पडत आहे. ज्या निवडणुकीत दोघेही मुंडे बहीण भाऊ एकत्र आले आहे. तर या निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून एक अर्ज दाखल करण्यात आला, जो अर्ज वैध ठरला. वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीसाठी मुंडे बहीण भावांनी विचारात घेतले नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने अर्ज दाखल केल्याचं उमेदवाराने सांगितले आहे.
यशश्री मुंडेंच विदेशातून वकिलीचे शिक्षण
आधी या बँकेत स्वतः दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी संचालक म्हणून काम पाहिलेले आहे. यशश्री मुंडे यांनी अर्ज दाखल केल्यामुळे याची जिल्ह्यात चर्चा होऊ लागली. विदेशातून वकिलीचे शिक्षण घेतलेल्या यशश्री मुंडेंनी आता बँकेच्या निवडणुकीत आपला अर्ज दाखल केल्याने त्या संचालक झाल्यास बँकेलाही याचा मोठा फायदा होईल, असे राजकीय जाणकार सांगतात. वैद्यनाथ बँकेच्या एकूण 17 जागांसाठी निवडणूक होत आहे. 10 ऑगस्टला मतदान तर 12 रोजी मतमोजणी होणार आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यशस्वी मुंडे या भगिनींसह 71 अर्ज दाखल झाले. 29 जुलै दरम्यान अर्ज मागे घेण्याचा कालावधी असून यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
हे ही वाचा