Hasan Mushrif : राज्यातील सत्ता समीकरणामुळं पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे त्रांगडे निर्माण झाले आहे. आगामी पदवीधरच्या निवडणुकीमध्ये आपल्याच पक्षाला उमेदवारी मिळावी यासाठी शड्डू ठोकले जात आहेत. यापूर्वी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होत असे. मात्र, अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानं महायुतीकडून ही जागा कोणाला मिळणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुणे पदवीधर आमदारकीच्या निवडणुकीला अजून दीड वर्ष बाकी आहेत. मात्र आतापासून आपल्या उमेदवाराचं नाव पुढे रेटण्याचा प्रयत्न करून सुरू झाला आहे. सध्या पुणे पदवीधरचे आमदार अरुण लाड (Arun Lad) असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडून आले आहेत. त्यामुळं आता ही जागा राष्ट्रवादीलाच मिळायला हवी अशी मागणी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) यांनी केली आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघावर भाजपनं केला दावा
यापूर्वी पदवीधरची लढत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच झाली आहे. त्यामुळे भाजप ही जागा राष्ट्रवादीला सोडणार का हा खरा प्रश्न आहे. कारण पुणे पदवीधर मतदार संघामधून चंद्रकांतदादा पाटील हे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपने देखील या मतदारसंघावर आपला दावा केला आहे.
राष्ट्रवादीकडून भैय्या माने यांच्या नावाची मागणी करणार, हसन मुश्रीफांची माहिती
दरम्यान, मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुणे पदवीधर मतदारसंघावर दावा करत आपले निकटवर्ती भैय्या माने यांच्या नावाची घोषणा करुन टाकली आहे. आमदार अरुण लाड यांच्या विजयामध्ये भैय्या माने यांचा वाटा मोठा असून आम्ही अजित पवार यांच्याकडे भैया माने यांच्या उमेदवारीची मागणी करणार आहोत अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. त्यामुळं भैय्या माने यांनी देखील शिक्षण संस्थांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत.
अरुण लाड यांनी आपल्या चिरंजीवांसाठी केली उमेदवारीची मागणी
दुसरं महत्त्वाचं म्हणजे अरुण लाड यांनी आपल्या चिरंजीवांसाठी उमेदवारीची मागणी केली आहे. जर उमेदवारी चिरंजीवाला मिळाली तर अजित पवार गटामध्ये जाण्यासंदर्भातील संकेत त्यांनी दिले आहेत. मात्र यावर कॅमेरासमोर बोलण्यास अरुण लाड यांनी मनाई केली आहे. पदवीधर निवडणुकीमध्ये उमेदवार पक्षीय नसावेत. या निवडणुकीतील उमेदवारी पक्षाने वाटून घेऊन नये. येणाऱ्या पदवीधर निवडणूकबाबत आमची अजून तयारी सुरू असल्याची माहिती अरुण लाड यांनी दिली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात आणि राष्ट्रवादीकडेच ही पदवीधरची उमेदवारी राहावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.
पदवीधरच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळी मतदाराची नोंदणी करून घ्यावी लागते. जो पक्ष अधिक नोंदणी करतो त्याच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडत असते. महायुतीमध्ये ज्या पद्धतीने उमेदवारी बाबत त्रांगडे निर्माण झाला आहे. तसेच महाविकास आघाडीमध्ये देखील अडचणी निर्माण झाल्या आहेत. राज्यात सत्ता समीकरणे बदलल्यामुळे महाविकास आघाडी अरुण लाड यांना उभा करणार की नवा उमेदवार शोधणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.