पुणे: राज्यात गुरूवारी मुख्यमंत्री आणि काही मंत्र्याचा शपथविधी पार पडणार आहे. अद्याप शपथ घेणाऱ्या नेत्यांची नावे गुलदस्त्यात आहेत. तर पुण्यातील मावळ विधानसभा मतदारसंघातून मावळ पॅटर्न मोडीत काढून विक्रमी मतांनी विजयी होणारे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांना देखील मंत्रीपद मिळण्याच्या चर्चा आता सुरू आहेत. अशातच मला मंत्री करण्याची इच्छा अजित दादांची ही आहे, असं म्हणत  मावळचे आमदार सुनील शेळकेंनी आणखी उत्सुकता वाढवली आहे. अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्री पदाच्या यादीत मावळच्या सुनील शेळकेंचं  (Sunil Shelke) नाव आहे. भाजप, शरद पवार गट, ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, मनसे यांसह विविध संघटनांच्या मावळ पॅटर्नवर शेळके भारी पडलेत. शेळके एक लाख आठ हजारांच्या मताधिक्याने निवडून आल्यानं अजितदादा त्यांना मंत्री पदाचं बक्षीस देतील, असा त्यांना विश्वास आहे. 


याबाबत एबीपी माझाशी बोलताना सुनील शेळके  (Sunil Shelke) म्हणाले, 'माध्यमांमध्ये मला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे अशा बातम्या पाहिल्या. परंतु मी अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ या कोणत्याही पक्षातील मोठ्या नेत्यांकडे माझी व्यक्तिगत इच्छा व्यक्त केलेली नाही. महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष आहेत. या पक्षातील प्रमुख नेत्यांना पहिले मंत्रिमंडळामध्ये स्थान दिले जाईल. त्यानंतर नवीन चेहऱ्यांना देखील संधी मिळणार आहे अशा पद्धतीची काही माहिती मला मिळाली आहे. मात्र, उद्याच्या काळामध्ये एखादी मोठी जबाबदारी मिळाली तर माझ्या पक्ष संघटनेकरता तालुक्याच्या विकासाकरिता अधिकच योगदान किंवा अधिक काम करण्याची ही माझी जबाबदारी असणार आहे, असं सुनील शेळके  (Sunil Shelke) यांनी म्हटले आहे. 


मी पक्षातील कोणतेही मोठ्या नेत्याकडे मंत्रिपदाची किंवा कोणत्याही पदाची मागणी केलेली नाही मी तितका मोठा नाही. सुनील शेळकेने ज्या संघर्षातून ज्या परिस्थितीतून ही निवडणूक जिंकलेली आहे ते पक्षातील नेते जाणतात. लाखांचं मताधिक्य ज्या वेळेला मिळतं देखील विचार करत असतात आणि त्याच पद्धतीचा नेते मंडळी माझा देखील विचार करत आहेत. परंतु येत्या काळामध्ये आम्हाला आमचा पक्षाला किती जागा मिळत आहेत, त्यावरून अनेक गोष्टी ठरतील सुनील शेळके  (Sunil Shelke) यांनी म्हटलं आहे.


अजित पवार दिल्लीत


राज्यात मंत्रीमंडळ, मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे दिल्लीत आहेत, ते अमित शाहांची भेट घेण्याची देखील शक्यता आहे. तिन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे.