Ravikant Tupkar बुलढाणा: बुलढाणा विधानसभा मतदारसंघात अत्यल्प मताधिक्याने विजयी झाल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाचे आ. संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी त्यांच्याच पक्षातील केंद्रीय मंत्री असलेले प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय कुटे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आता या आरोपांवर रविकांत तुपकर यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. आ. संजय गायकवाड यांनी केलेल्या आरोपात सत्यता असून हा सर्व घटनाक्रम मी अनुभवला असल्याची प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी दिली आहे. आ. संजय गायकवाड हे सत्य बोलणारे व्यक्तिमत्व असून त्यांनी केलेल्या आरोपात सत्यता आहे व त्यांच्याच पक्षातील केंद्रीय मंत्र्यांवर त्यांनी आरोप केल्याने हे गंभीर आरोप आहे. अशी प्रतिक्रिया ही रविकांत तुपकर यांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेचे आ. संजय गायकवाड व त्यांच्या जिल्ह्यातील केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि भाजप आमदार संजय कुटे यांच्यातील वाकयुद्ध आगामी काळात शमण्याची चिन्ह तरी सध्या दिसत नाहीत.


नेमकं काय म्हणाले रविकांत तुपकर?


आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या आरोपात सत्यता आहे. मी ह्या सगळ्या घटना अनुभवल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी मला ए बी फॉर्म देऊ केला. मात्र दोन तासात अनेक घडामोडी झाल्या आणि मला नकार देण्यात आला. शिवसेनेचे नेते अनिल परब देखील या सर्व घटना जाणून आहेत. मला बुलढाणा विधानसभेत उमेदवारी मिळाली असती तर प्रतापराव जाधवांना भविष्यात ते जड गेलं असतं. संजय गायकवाड हे खरं  बोलणार व्यक्तिमत्त्व आहे, त्यांनी प्रतापराव जाधव यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत. आपल्याच पक्षातील एक नेता पुढे जाऊ नये म्हणून कसं कारस्थान रचल जात हे संजय गायकवाड यांनी समोर आणलं आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे महाविकास आघाडीला वाढलेला आत्मविश्वास नडला , त्यामुळे विधानसभेत यश मिळालं नाही. आमच्या सारख्या छोट्या घटक पक्षाना आघाडीने सोबत घेतलं नाही , नाहीतर चित्र वेगळं असतं, असेही रविकांत तुपकर म्हणाले. 


आमदार संजय गायकवाडांकडून मोठा गौप्यस्फोट 


बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी एबीपी माझाशी बोलताना एक मोठा गौप्यस्फोट केला. आपल्याच पक्षातल्या नेत्यांनी निवडणुकीत गद्दारी केल्याचं गायकवाडांचं म्हणणं आहे. त्यांचा रोख होता तो शिवसेनेचे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव आणि भाजपचे आमदार संजय कुटे यांच्याकडे. माझ्याच पक्षातील प्रतापराव जाधव यांनी मिलिंद नार्वेकरांना फोन करून माझ्या विरुद्ध तुपकर यांच्या ऐवजी जयश्री शेळके यांना उमेदवारी देण्याच सांगितलं. भाजपाच्या संजय कुटे यांनी कट रचून अनिल परब यांना संपर्क करून माझ्या विरोधात जयश्री शेळके यांना उमेदवारी दिली असा दावा संजय गायकवाडांनी केला. 


संजय गायकवाडांनी थेट ठाकरेंच्या शिवसेनेतील मिलिंद नार्वेकर आणि अनिल परबांसारख्या मोठ्या नेत्यांचं नाव घेतल्यानं एकच खळबळ माजली. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत बुलढाणा मतदारसंघातून संजय गायकवाड आमदार झाले. संजय गायकवाडांना सर्वाधिक 91 हजार 660   मतं मिळाली. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या जयश्री शेळकेंना 90 हजार 819 मतं मिळाली.  त्यामुळे संजय 
गायकवाड अवघ्या 841 मतांनी जिंकले.


ही बातमी वाचा: