मुंबई : बार्शी तिथं सरशी हा शब्द बहुतेकांच्या ओळखीचा आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे राजकारण राज्यभरात चर्चिले जाते. प्रादेशिक दृष्ट्या पश्चिम महाराष्ट्रात असलेला बार्शी मतदारसंघ लोकसभेला मात्र मराठवाड्यात जातो. या मतदारसंघाला एक नाही अनेक इतिहास आहेत. आजच्या विधानसभेच्या निकालात देखील एका इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. तो इतिहास म्हणजे या मतदारसंघात सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणारा उमेदवार निवडून येत नाही. राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले दिलीप सोपल यांचा त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांनी पराभव केला आणि पुन्हा त्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली.


सलग सहा वेळा विधानसभेवर गेलेले दिलीप सोपल यांनी देखील सहा पैकी पाच वेळा वेगवेगळ्या चिन्हावर निवडणुका लढवल्या आहेत. अपक्ष असताना त्यांना आघाडी सरकारच्या काळात मंत्रिपद मिळाले होते. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे राजेंद्र राऊत यांची गोची झाली. कारण शिवसेनेचा हा पारंपरिक मतदारसंघ असल्याने हे तिकीट सोपलांना मिळाले. परिणामी राऊतांनी भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. शिवसेना सत्तेत असल्याने सोपल यांचे पारडे जड मानले जात होते मात्र इतिहास राऊत यांच्या बाजूने होता की काय असेच म्हणावे लागेल. कारण राऊतांनी अपक्ष उभे राहत सोपलांना पराभूत केले आहे. यापूर्वी दिलीप सोपल यांनी देखील अपक्ष उभे राहत राऊतांचा पराभव केला होता. तेव्हा राऊत काँग्रेसकडून उभे होते आणि ही जागा काँग्रेसला सुटल्याने सोपलांना अपक्ष निवडणूक लढवावी लागली होती.

'रोलर'ने राऊतांना भरली होती धडकी 

बार्शी विधानसभेत सोपल आणि राऊत यांच्या विजय किंवा पराभवात राष्ट्रवादीचे उमेदवार निरंजन भूमकर हे किती मतं घेतात यावर फॉर्म्युला ठरत होता आणि चर्चा केली जात होती. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाल्यावर अपक्ष उमेदवाराने राऊत यांना धडकीच भरवायला सुरुवात केली. विशाल कळसकर या अपक्ष उमेदवाराचे चिन्ह 'रोडरोलर' होते. एरवी कुठल्याही चर्चेत नसणारे कळसकर यांनी सुरुवातीच्या काही फेरींमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारापेक्षा अधिक मतं घेतली होती. याच कारण नंतर ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी मात्र सर्वजण चकित झाले. कारण मतदारांनी राऊत यांचे ट्रॅक्टर समजून रोलरला मतं दिली अशी चर्चा आहे. खुद्द राऊत यांनी देखील विजयानंतर ही गोष्ट कबूल केली. रोडरोलर चिन्हामुळे आपला दहा हजार मतांचा लीड कमी झाला असे त्यांनी म्हटले.

दुसऱ्यांदा सोपलांचा पराभव करत राऊतांनी विधानसभा गाठली

1999 पासून पुढचं राजकारण हे दिलीप सोपल आणि राजेंद्र राऊत या दोन नावांभोवतीच फिरताना पाहायला मिळत आहे. बार्शीत सध्या तरी 'साहेब' आणि 'भाऊ' या दोन नावाचेच पक्ष आस्तित्वात असल्याचे चित्र आहे. बार्शी विधानसभेचा 1962 पासूनचा इतिहास पाहिला तर बार्शी विधानसभेवर फक्त एकदा शिवसेनेचा भगवा फडकला आहे. 1985 साली पहिल्यांदा निवडणूक लढविणारे दिलीप सोपल निवडून आले. 1985 साली शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसपक्षाकडून ते आमदार झाले. 1990 साली काँग्रेस, 1995 अपक्ष, 1999 राष्ट्रवादी काँग्रेस, 2009 अपक्ष, 2014 राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर सोपल विधानसभेवर गेले. सलग सहावेळा वेगवेगळ्या चिन्हावर आमदार होण्याचा वेगळा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. या राजकीय कारकिर्दीत त्यांच्यासमोर विरोधक टिकू शकला नाही. पण 1999 पासून मात्र शेतकरी कुटुंबातून आलेल्या राजेंद्र राऊत अर्थात 'भाऊं'नी दिलीप सोपल अर्थात 'साहेबां'ना ठस्सल द्यायला सुरुवात केली. आज दुसऱ्यांदा त्यांनी सोपलांचा पराभव करत विधानसभा गाठली आहे.

बार्शी विधानसभा । बार्शी तिथं कुणाची व्हणार सरशी, 'साहेब' की 'भाऊ' कोण मारणार बाजी?