UP Goa Uttarakhand Elections 2022 : उत्तर प्रदेश, गोवा आणि उत्तराखंडमध्ये विधानसभेसाठी आज मतदान होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. दरम्यान, 11 वाजेपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये 23 टक्के मतदान झाले आहे, तर गोवा 27 टक्के आणि उत्तराखंडमध्ये 19 टक्के मतदान झाले आहे. दरम्यान, उत्तराखंडमध्ये एका 100 वर्षाच्या वृद्धाने मतदानाचा हक्क बजावला आहे. सहसपुर विधानसभा मतदारसंघात त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. लाल बहादुर असे त्या 100 वर्षीय वृद्धाचे नाव आहे. सशक्त लोकशाहीसाठी सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे. 


 


आज उत्तर प्रदेशातील दुसऱ्या टप्प्यातील 55 जागांसाठी मतदान होत आहे, तर गोव्यातील 40 जागासाठी आणि उत्तराखंडमधील 70 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. देशात सध्या पाच राज्यात विधानसभा निवडणुकांचा माहोल सुरू आहे. यामध्ये आज तीन राज्यात मतदान प्रकिया पार पडत आहे. उत्तर प्रदशमध्ये दुसऱ्या टप्प्यातील तर गोवा आणि उत्तराखंडमध्ये देखील आज मतदान होत आहे. या मतदनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले आहे. यामध्ये त्यांनी लोकांना लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. जास्तीत जास्त मतदान करुन नवे रेकॉर्ड करा. प्रथम मतदान त्यानंतर दुसरे काम असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.






तिन्ही राज्यांमध्ये 165 जागांसाठी मतदान 


आज उत्तर प्रदेशमधील दुसऱ्या टप्प्यातील तर उत्तराखंड आणि गोव्यातील सर्व विधानसभा जागांसाठी मतदान होत आहे. तिन्ही राज्यात मिळून आज एकूण 165 जागांसाठी मतदान होत आहे. यासाठी 1 हजार 519 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यूपीमधील 55 विधानसभा जागांसाठी 586 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेत तर, उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी 632 आणि गोव्यातील 40 जागांसाठी 301 उमेदवार रिंगणात आहेत. यूपीमध्ये आज एकूण 2.2 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्याचबरोबर गोव्यात 11 लाख आणि उत्तराखंडमध्ये 81 लाख 43 हजार 922 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.


महत्त्वाच्या बातम्या: