स्वराज्यजननी राजमाता जिजाऊंची जन्मभूमी अशी ओळख असलेल्या सिंदखेड राजामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालीय. राज्यात आघाडीत आणि युतीमध्ये जो सुप्त संघर्ष सुरु आहे त्याची झलक सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळते. शिवसेनेचे आमदार डॉ. शशिकांत खेडेकर गेल्या पाच वर्षांपासून या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत. यंदाही ही जागा शिवसेनेच्या वाट्याला जाणार हे जवळपास निश्चित आहे. परंतु भाजपाचाही या जागेवर डोळा असल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे. त्यामुळे भाजपच्या हालचालीवर सगळ्यांचंच लक्ष लागलंय. एकेकाळी राष्ट्रवादीचा गड असलेल्या या मतदारसंघावर आता काँग्रेसही दावा सांगत असल्यानं आघाडीतही सर्व काही आलबेल आहे असं म्हणता येणार नाही.

सिंदखेड राजा हा पश्चिम विदर्भातल्या बुलडाणा जिल्ह्यातील मतदारसंघ. बुलडाण्यातल्या सात विधानसभा मतदारसंघांपैकी एक असलेला हा मतदारसंघ. बुलडाणा जिल्ह्यातील सातवा म्हणजे मलकापूर मतदारसंघ लोकसभेसाठी खानदेशातल्या रावेर मतदारसंघाला जोडला जातो. या जिल्ह्यातील उर्वरित सहा मतदारसंघ बुलडाणा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट होतात.

उल्कापातामुळे जगप्रसिद्ध लोणार सरोवरही याच बुलडाणा जिल्ह्यात आहे. सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात, देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा हे दोन पूर्ण तालुके तसंच चिखली आणि लोणार तालुक्यातील काही भाग येतो.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या डॉ. शशिकांत खेडेकर यांनी भाजपच्या डॉ. गणेश मांटे यांचा तब्बल 20 हजार मतांनी पराभव केला होता. 2014 च्या आधी दोन दशकं राष्ट्रवादीच्या राजेंद्र शिंगणे यांनी एकहाती सत्ता गाजवली. खरेदी विक्री संघ, बाजार समिती, पंचायत समित्यांवर आपलं वर्चस्व मिळवलं. मात्र जिल्हा बँकेला मदत न मिळाल्यानं 2014 साली डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी माघार घेतली. राष्ट्रवादीकडून रेखाताई खेडेकर मैदानात उतरल्या मात्र त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं. त्यामुळे या जागेवर दावेदारीसाठी काँग्रेस आग्रही आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल1. डॉ. शशिकांत खेडेकर, शिवसेना - 64203



2. डॉ. गणेश मंटे, भाजप - 45349

3. रेखाताई खेडेकर, राष्ट्रवादी - 37161

शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांचा मतदारसंघातला दांडगा जनसंपर्क ही जमेची बाजू मानली जाते. आपल्या मतदारसंघातल्या विविध विकासकामासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करून त्यांनी मतदारसंघाला निधी उपलब्ध करुन दिलाय. सोबतच 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही जिल्ह्यात आणि मतदारसंघात शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारली होती. विद्यमान आमदार खेडेकर यांच्या कामाची ती पावती होती असं म्हणायला हरकत नाही. म्हणूनच त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी भाजपकडूनही उमेदवारीसाठी इच्छूकांनी गर्दी केली आहे. पण शिवसेना आपल्या जागेवर ठाम असल्याचं दिसून आलंय.

गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या रेखाताई खेडेकर या थेट तिसऱ्या क्रमांकावर गेल्या. त्यामुळे काँग्रेसही या मतदारसंघावर दावा करतंय. काँग्रेसचे अनिल सावजी यांनी पक्षश्रेष्ठींकडे त्यासाठी फिल्डिंग लावल्याचीही चर्चा आहे. मात्र राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेंद्र शिंगणे यांनी थेट सभा आणि बैठका घ्यायला सुरुवात केली आहे आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे युती आणि आघाडीतला संघर्ष आता उघडपणे  जाणवू लागलाय.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं आपली ताकद दाखवून दिली आणि राज्यातलं राजकारण ढवळून निघालं होतं. तोच वंचित फॅक्टर सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातही डोकेदुखी ठरण्य़ाची शक्यता नाकारता येत नाही. विद्यमान जिल्हा परिषदेचे सदस्य असलेले मनोज कायंदे यांना वंचितकडून उमेदवारी मिळण्याची चर्चा सुरू आहे. तसं झालं तर येत्या निवडणुकीत मतदारसंघातलं मतांचं समीकरण बदलू शकतं. सिंदखेड राजामध्ये कायंदे या राजकीय परिवाराचा दबदबा असल्यानं त्याचा फायदा वंचितला होऊ शकतो.

एकूणच सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात येणारा काळ राजकीय उलथापालथीचा असू शकतो. याचं कारण म्हणजे सर्व पक्षांकडून उमेदवारीसाठी दावे प्रतिदावे केले जात आहे. सध्यातरी शिवसेनेची दावेदारी प्रबळ असली तरी भाजपही त्यासाठी प्रयत्न करतोय. दुसरीकडे राष्ट्रवादीनं थेट कामाला सुरुवात केली असली तरी काँग्रेसक़डूनही ही जागा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शेवटी या डावपेचांमध्ये कोण यशस्वी होतंय ते येणारा काळच ठरवेल.