भिवंडी पूर्वीपासून व्यापार केंद्र म्हणून ओळखलं जात आहे. शिवपूर्वकाळापासून भिवंडी शहराला स्वतःचं असं नैसर्गिक बंदर आहे. त्यामुळे या भागातल्या व्यापार उदीमाची भरभराट झाली. ब्रिटिशकाळापासून मँचेस्टर ऑफ इंडिया म्हणून भिवंडी शहराची ओळख आहे. देशातले सर्वाधिक कापड कारखाने या ठिकाणी आहेत. त्यामुळे  बहुतांश रोजगार हा या टेक्स्टाईल इंडस्ट्रीमधूनच उपलब्ध झाला आहे. भिवंडी हा ठाणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघ असून त्यातील 137 भिवंडी पूर्व  हा विधानसभा मतदारसंघ आहे.

भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे रुपेश म्हात्रे हे विद्यमान आमदार तर भाजपचे कपिल पाटील हे विद्यमान खासदार आहेत. भिवंडी पूर्व विधानसभेत रुपेश म्हात्रे हे दोन वेळा शिवसेनेच्या तिकीटावर विजयी झालेत. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत ते एक प्रबळ दावेदार मानले जात आहेत. 2014 च्या लढतीत शिवसेनेचे रुपेश म्हात्रे आणि भाजपचे संतोष शेट्टी यांच्यात चुरशीची लढत झाली. त्यामध्ये रुपेश म्हात्रे यांनी 3393 मतांनी भाजपच्या संतोष शेट्टी यांचा पराभव केला. यावर्षी शिवसेना-भाजप युती होण्याची चर्चा असल्याने भिवंडी पूर्वची जागा कोणत्या पक्षाकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ही जागा जर शिवसेनेला मिळाली तर भाजपचे संतोष शेट्टी दुसऱ्या पक्षात उडी मारू शकतात किंवा अपक्षही लढण्याची त्यांची तयारी आहे अशी चर्चा शहरात आहे.  यंदा माजी आमदार योगेश पाटील काँग्रेसमधून इच्छुक असल्याने ही लढत रंगतदार  होण्याची शक्यता आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भिवंडी पूर्व मतदारसंघातून शिवसेनेकडून रुपेश म्हात्रे, भाजपाचे संतोष शेट्टी , काँग्रेसचे योगेश पाटील, अरुण राऊत, तारिक फारुकी आणि प्रशांत लाड, समाजवादी पक्षाचे रिजवान मिस्टर आणि एमआयएमकडून शादाब उस्मानी इच्छुक आहेत. सेनेचे रुपेश म्हात्रे यांनी दोन वेळा भिवंडी पूर्व विधानसभेवर विजय मिळवला आहे. भाजपाचे संतोष शेट्टी मागील 25 वर्षांपासून नगरसेवक आहेत. त्यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता काँग्रेसचे इच्छुक असलेले योगेश पाटील हे 2005 साली शिवसेनेत होते, तर अरुण राऊत आणि प्रशांत लाड हे दोन वेळा नगरसेवक होते. त्यांनीही शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. समाजवादी पक्षाचे रिजवान मिस्टर हे महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी आहेत तर एमआयएमचे शादाब उस्मानी हे पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत.

2009 च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि शिवसेनेत दुरंगी लढत झाली होती. या लढतीत समाजवादी पार्टीचे अबू आजमी यांनी शिवसेनेच्या योगेश पाटील यांना पराभूत केलं. अबू आझमी यांना 37584 मते मिळाली होती तर शिवसेनेचे योगेश पाटील यांना 24599 मते मिळाली. समाजवादी पार्टीचे अबू आझमी भिवंडी आणि गोवंडी या दोन विधानसभातून एकाच वेळी जिंकून आल्याने अबू असीम आझमी यांनी भिवंडी पूर्व विधानसभेचा राजीनामा दिला. त्यामुळे २०१० मध्ये भिवंडी पूर्व विधानसभेत पोट निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत समाजवादी पक्षाकडून अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमी तर शिवसेनेच्या वतीने रुपेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली.

काँग्रेसकडून सैय्यद मुजफ्फर हुसेन रिंगणात होते. 2010 च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे रुपेश म्हात्रे यांनी भिवंडी पूर्व विधानसभेत अवघ्या 1676 मतांनी बाजी मारली.

2014 भिवंडी पूर्व विधानसभा निवडणुकीत  भाजप, समाजवादी, शिवसेना, एनसीपी, काँग्रेस आणि एमआयएमसह सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार निवडणुकीत उतरवले होते. पण खरी लढत शिवसेनेचे रुपेश म्हात्रे आणि भाजपचे संतोष शेट्टी  यांच्यातच झाली त्यात शिवसेनेचे रुपेश म्हात्रे विजयी झाले.