मुंबई: लोकसभा निवडणुकीतील पराभव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्य करावा. जनतेने मोदींना नाकारलं आहे. 'झोला लेकर जाईए', हाच जनादेश आहे. श्रीराम आणि बजरंगबली या दोघांनीही नरेंद्र मोदी (PM Modi) यांना नाकारले आहे, अशा बोचऱ्या शब्दांत ठाकरे गटाचे खासदार यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर सडकून टीका केली. 


प्रभू श्रीराम आणि बजरंगबली कोणीही मोदींसोबत नाही. श्रीराम आणि बजरंगबली आमच्यासोबत आहेत. ज्या अयोध्येत राम मंदिर उभारण्यात आलं तेथील फैजापूर लोकसभा मतदारसंघातही भाजपचा पराभव झाला. याचठिकाणी मोदींनी इव्हेंट केला होता, अनेक दिवस व्रत केले होते. पण देशाच्या जनतेने नरेंद्र मोदी यांना नाकारले आहे. जनतेने मोदींना फेअरवेल दिलंय, अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली. 


इंडिया आघाडीन मोदी-शाहांच्या अहंकाराचा पराभव केला: संजय राऊत


2014 ते 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पूर्ण बहुमत मिळवले होते. पण 2024 च्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले नाही. या निवडणुकीत मोदी आणि अमित शाहांचा पराभव झाला. राहुल गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी, स्टॅलिन या सगळ्यांनी जीवतोड मेहनत केली. या लढाईत मोदी-शाहांचा अहंकार इंडिया आघाडीने संपवला. आता त्यांची धावपळ सुरु झाली आहे. सरकार स्थापन करण्यासाठी आमच्यासोबत या, यासाठी ते हातापाय जोडत आहेत. यानंतरही मोदी-शाहांनी तोडफोड करुन सरकार स्थापन केले तर लोक संतापून रस्त्यावर उतरतील. मोदींचं नाक कापलं गेलंय, त्यांनी भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यायला पाहिजे. आधी भाजप 400 पारची भाषा करत होते, मग हा आकडा 350 पर्यंत खाली आला, पण भाजपला 250 जागाही मिळाल्या नाहीत. मुंबईत आणि महाराष्ट्रात मोदींना आम्ही रोखलंय, असे संजय राऊत यांनी म्हटले.


मुंबईत भाजपचे ढोलताशे न वाजताच माघारी


उत्तर मध्य मुंबईत भाजपने जल्लोषासाठी आणलेले बँजो, ताशे न वाजवताच माघारी नेण्यात आले. मुंबईतील पराभवामुळे कार्यकर्ते देखील शांत आणि दुःखी दिसत होते. उत्तर मध्य मुंबईच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी एकीकडे मतमोजणी आणि दुसरीकडे जल्लोषाची तयारी केली होती. मात्र, चुरशीच्या झालेल्या लढतीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी बाजी मारली. त्यामुळे जल्लोषासाठी आणलेले ढोल-ताशे वाजलेच नाहीत. या निकालानंतर कार्यकर्ते देखील नाराज झाले.


आणखी वाचा


ना लेकाला निवडून आणता आलं ना पत्नीला; अजित पवारांच्या पदरी पराभवाची मालिका