Sharad Pawar on Vishal Patil : सांगलीत अपक्ष उमेवार विशाल पाटील विजयी झाले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मतदान झालं निवडणूक झाली त्यामुळं आता त्यावर चर्चा नको. विजयी झाले अभिनंदन आहे", अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 


मी महाराष्ट्रातील तमाम जनतेविषयी कृतज्ञता व्यक्त करतो


शरद पवार म्हणाले, लोकसभा निवडणूकांचे सर्व निकाल अद्याप हाती आले नसले तरी महाराष्ट्राने परिवर्तनाच्या दिशेने निकाल घेतल्याचे स्पष्ट होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उ.बा. ठा.) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) ह्या महाराष्ट्र विकास आघाडीतील घटकांनी सामूहिकरित्या जनतेपुढे आपली भुमिका मांडली. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून शाहू-फुले-आंबेडकरांचा पुरोगामी विचार पुढे नेणे, लोकशाही मुल्यांचे रक्षण करणे ही ती प्रमुख भुमिका होती. जाती-धर्माच्या वादा पलीकडे जाऊन रोजगार, महागाई यांसारख्या दैनंदिन भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आघाडी कटीबद्ध होती. ह्या भूमिकेचे जनतेने स्वागत केले, सन्मान राखला आणि म.वि.आ. वर विश्वास दाखवला याबद्दल मी महाराष्ट्रातील तमाम जनतेविषयी कृतज्ञता व्यक्त करतो.


शेवटच्या घटकाच्या हिताची जपणूक करण्यासाठी आम्ही सतत सामूहिक प्रयत्न करू


पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सहकार्याने महाराष्ट्र विकास आघाडी आपली भुमिका तळागळातील जनतेपर्यंत नेण्याचा प्रयत्न करेल आणि शेवटच्या घटकाच्या हिताची जपणूक करण्यासाठी आम्ही सतत सामूहिक प्रयत्न करू असा शब्द आपणास देतो.


ह्या निवडणूक निकालाने देशातील चित्र देखील बदलले आहे. ह्यात महाराष्ट्राची प्रमुख भुमिका आहे. याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचा मला अभिमान आहे. देश हिताच्या दृष्टीने इंडिया आघाडी काही पावले टाकत असतील तर महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सामूहिक योगदान देण्यात अग्रभागी राहू. अतिशय संघर्षपूर्ण झालेल्या ह्या लोकशाही लढ्‌यात महाराष्ट्रातील जनतेने कणखर साथ दिली त्याबद्दल जनतेचे मी पुन्हा ऋण व्यक्त करतो. तसेच महाराष्ट्र विकास आघाडीतील असंख्य कार्यकर्त्यांनी हे यश मिळवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले त्याबद्दल त्यांचे मनः पुर्वक अभिनंदन करतो, असंही शरद पवार यांनी सांगितलं. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Pune Lok Sabha Result 2024 : पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे मुरलीधर मोहोळ विजयी, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर पराभूत