उस्मानाबाद : शिवसेना आणि भाजपने अखेर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युती जाहीर केली. या पत्रकार परिषदेमध्ये लोकसभेच्या जागावाटपाची घोषणा करण्यात आली, पण विधानसभेच्या जागांचा कसं वाटप झालं हे युतीच्या नेत्यांनी सांगितलं नाही. 'एबीपी माझा'च्या सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसार विधानसभेचं जागावाटपही 'मातोश्री'वर झालं आहे. मात्र 2014 साली शिवसेना जितक्या जागांसाठी अडून बसली होती, तितक्या जागाही त्यांच्या वाट्याला आलेल्या नाहीत.

शिवसेनेत 9 या आकड्याला फार महत्त्व आहे. शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ असो, किंवा युतीची घोषणा करणाऱ्या पत्रकार परिषदेची तारीख... नऊ आहेच. विधानसभेच्या जागावाटपातही नऊची बेरीज होईल एवढ्या जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत.

शिवसेना विधानसभेच्या 135, तर भाजप 153 जागा लढवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपच्या कोट्यातून मित्रपक्षांना 18 जागा देण्यात येणार आहेत. म्हणजे भाजप शिवसेना प्रत्येकी 135-135 जागा लढवेल.

शिवसेनेला केंद्रात भाजपची सत्ता आली, तर हरकत नाही. राज्यात मात्र शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा आहे. त्यासाठी अधिक जागा मिळाव्यात म्हणून 2014 साली सेनेने युती तोडली. पण 2014 साली शिवसेना आग्रही होती, तेवढ्याही जागा शिवसेनेला काल झालेल्या जागावाटपात मिळाल्या नाहीत.

भाजपच्या मित्रपक्षात रामदास आठवले यांचा रिपाइं, महादेव जानकरांचा रासप, सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, विनायक मेटे यांचा शिवसंग्राम अशी मंडळी आहेत. हे नेते निवडून आल्यावरही भाजपच्या कळपात जाणार. पुढे ही ज्याच्या जास्त जागा, त्याच पक्षाचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला आहे. दुसऱ्या पक्षाच्या वाट्याला उपमुख्यमंत्रीपद येऊ शकतं.

शिवसेना आपल्या प्रचाराचा प्रारंभ नेहमी तुळजाभवानीच्या दरबारातून करते. भाजप आणि शिवसेनेची निवडणूक प्रचाराची संयुक्त सभा लवकरच होणार आहे. प्रचाराच्या संयुक्त सभेत साडेचार वर्षात पहिल्यांदाच शिवसेनेची टीका विरोधीपक्षाच्या नेत्यावर असेल. परंतु हा प्रचार जनतेच्या मनाला पटेल का, याविषयी साशंकताच आहे.