मुंबई : लोकलच्या डब्यात एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला मुंबईत गजाआड करण्यात आलं आहे.
आठवड्याभरापूर्वी मध्य रेल्वेवर सँडहर्ट्स रोड आणि मस्जिद बंदर स्थानकांदरम्यान या विकृताने महिलेचा विनयभंग केला होता. त्यानंतर सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांनी अशरफ अली करीमुल्ला शेखला बेड्या ठोकल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 2017 साली केलेल्या विनयभंग प्रकरणी तो तुरुंगातून सुटून आला होता.

आठवड्याभरपूर्वी सँडहर्ट्स रोड आणि मस्जिद बंदर स्थानकादरम्यान संबंधित महिला लोकलने प्रवास करत होती. त्यावेळी लोकलमध्ये महिला डब्यात घुसून अशरफने महिलेचा विनयभंग केला होता. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याच्यावर याआधीही अशाच प्रकारचे गुन्हे नोंद असल्याचं समोर आलं आहे.

2017 साली अशरफने 15 वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तिने घाबरुन लोकलमधून उडी मारली होती. या गुन्ह्यात त्याला एक वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. ऑक्टोबर 2018 मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर आरोपीने पुन्हा हा गुन्हा केला आहे.

अशरफवर दादर आणि सीएसएमटी रेल्वे पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे नोंद आहेत. यामध्ये तो जामिनावर सुटला होता. 2017 साली विनयभांगच्या गुन्ह्यात शिक्षा सुनवल्यामुळे त्याची पत्नी सोडून गेली होती. त्याला दोन मुलंसुद्धा आहेत.