मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस पाठवल्याबद्दल मला विशेष वाटत नाही. या प्रकरणाकडे राजकीय दृष्टीने पाहू नये, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं. तर या प्रकरणात काळंबेरं असू शकेल, पण पूर्ण माहितीशिवाय बोलणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया मनोहर जोशी यांनी दिली आहे.


तपास यंत्रणांना निष्पक्षपाती काम करण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे : राऊत

संजय राऊत म्हणाले की, "मी सुद्धा अनेक वेळा सरकारविरोधात आवाज उठवला आहे. मलाही नोटीस यायला हवी होती. या देशात लोकशाही आहे. जर मी चुकीची गोष्ट केली नसेल तर मी ते सिद्ध करु शकतो. आपल्या तपास यंत्रणेवर चांगले संस्कार आहेत. या यंत्रणांना निष्पक्षपाती काम करण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. मी अनेकांची चौकशी होताना पाहिलं आहे, त्यामुळे मला याबद्दल (राज ठाकरेंच्या नोटीसबाबत) काही विशेष वाटत नाही."



काळंबेरं असू शकेल, पण पूर्ण माहितीशिवाय बोलणं योग्य नाही : मनोहर जोशी



तर या प्रकरणात राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. याविषयी मनोहर जोशी यांना विचारलं असता, ते म्हणाले की, "मला याबाबतची बातमी वाचावी लागेल, त्याशिवाय काही बोलणं योग्य नाही. माझी उन्मेषशी भेटच झालेली नाही. यामागे काही कळंबेरं असू शकेल, पण याबाबत पूर्ण माहिती घेतल्याशिवाय काही बोलणं मी योग्य मानत नाही. तुम्ही ज्यावेळीस बिझनेसमध्ये उतरता त्यावेळी अशा गोष्टींना तोंड द्यावं लागतं. मी पाहत असताना या संस्थेत असे गैरप्रकार झाले नव्हते, यावेळी अशी बातमी प्रथमच येत आहे. याबाबत विचारपूर्वक उत्तर देऊ. वाटलंच तर मुख्यमंत्र्यांना भेटेन."

राज ठाकरे यांना ईडीची नोटीस

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांना कोहिनूर प्रकरणात ईडीने नोटीस बजावून त्यांना 22 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दादरमधील कोहिनूर मिल क्रमांक तीन विकत घेण्यामध्ये राज ठाकरे यांची भूमिका असून यासाठीच ते ईडीच्या रडारवर होते.

कर नाही त्याला डर कशाला? राज ठाकरेंना ईडीच्या नोटीसनंतर मनसे आक्रमक

काय आहे प्रकरण?

काही वर्षांपूर्वी एनमसीटीच्या मालकीची असलेल्या कोहिनूर मिल क्रमांक 3 च्या जागेचा लिलाव झाला होता. ही जागा अगदी मोक्याच्या ठिकाणी म्हणजे दादरमधील शिवाजी पार्क येथे शिवसेना भवनाच्या अगदी समोर आहे. या जागेचा लिलाव 421 कोटी रुपयांना झाला आणि ही जागा मनोहर जोशींचा मुलगा उन्मेष जोशी यांच्या कंपनीने विकत घेतली. उन्मेष जोशी यांच्या कंपनीत स्वतः उन्मेष जोशी, राज ठाकरे आणि राजन शिरोडकर हे तिघे समान भागीदार होते. कोहिनूर मिलची जागा विकत घेताना उन्मेष यांनी आयएल अॅण्ड एफएसला ही सोबत घेतलं. 421 कोटी रुपयांपैकी पन्नास टक्के रक्कम उन्मेष जोशी तर उर्वरित पन्नास टक्के रक्कम आयएल अॅण्ड एफएस कंपनीने भरले. काही वर्षांनंतर आयएल अॅण्ड एफएसने आपला 50 टक्के हिस्सा 90 कोटी रुपयांना विकला. गुंतवणूक 225 कोटींची असूनदेखील तो हिस्सी कंपनीने 90 कोटी रुपयांना विकला आणि त्यानंतरदेखील आयएल अॅण्ड एफएस उन्मेष जोशींच्या कंपनीला कर्ज देत होते. उन्मेष जोशी यांच्या कंपनीला सुमारे 500 कोटी रुपयांचं लोन दिलं होतं, ते कंपनीला चुकतं करणं शक्य नसल्याने त्या 500 कोटी रुपयांच्या बदल्यात जागा घेण्याचा आयएल अॅण्ड एफएस कंपनीने निर्णय घेतला. साधारण 2011 साली आयएल अॅण्ड एफएसने उन्मेष यांच्या कंपनीकडून 500 कोटींची जागा घेतली, मात्र या व्यवहाराबाबतची नोंदणी 2017 साली करण्यात आली. हा व्यवहार संशयास्पद असल्याचं ईडीच्या सूत्रांचं म्हणणं आहे.