डोंगराला सुमारे 10 ते 12 फूट खोल आणि 10 ते 15 फूट रुंद भेगा पडल्या आहेत. त्यामुळे एक हजार लोकवस्ती असलेल्या भडवले गावाला धोका निर्माण झाला आहे. या गावाचे माळीण होण्याच्या भीतीने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत. रात्र जागून काढण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. परंतु सरकारकडून कोणतीही पाऊले उचलले जात नसल्याने भडवले गावचे माळीण होण्याची सरकार वाट पाहतंय का असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
भूस्खलनामुळे या गावातील रस्ते उखडले आहेत. डोंगरावरील भली मोठी मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. या डोंगरावर सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतरावर भूस्थलन होऊन भल्या मोठ्या भेगा पडल्या आहेत. डोंगरावर ठिकठिकाणी जमीन दलदल झाली आहे. त्यामुळे बागायती, भातशेतीकडे जाता येत नाही. शाळेला धोका असल्याने शाळा सुद्धा बंद आहेत. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले आहेत, परंतु कुठे स्थलांतरित व्हायचे?, वयोवृद्ध माणसांनी कुठे जायचे? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.