नागपूर: शिवसेना-भाजप युतीच्या तीन दशकांपेक्षा जास्त काळाच्या संसारात यंदा म्हणजे 2019लाच (किंवा 2014ला) शिवसेना 'छोटा भाऊ' झाली असा जर तुमचा समज असेल तर, तो चुकीचा आहे. मुख्यमंत्रिपदासह सत्तेच्या ५०-५० अर्थात समसमान वाटपासाठी शिवसेना सध्या आकाशपाताळ एक करत असली, तरी युतीच्या इतिहासाची सेना पक्षनेतृत्वाला पुरेपूर जाण आहे. त्यामुळे, तुटेपर्यंत न ताणता शिवसेना काही महत्वाच्या खात्यांसह सत्तेत सहभागी होण्याचीच शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करतायत. याला जसा 1995साली शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि भाजपचा उपमुख्यमंत्री झाल्याचा संदर्भ आहे, तसाच भाजपची केवळ एक जागा जास्त आल्यानं सेनेनं विरोधी पक्षनेतेपदावर पाणी सोडल्याचेही उदाहरण आहे.


शिवसेना-भाजप मैत्रीची सुरुवात ही बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांच्यामुळे झाली. अर्थात, निवडणुका एकत्र लढल्या तरी सत्ता हाती यायला 1995साल उजाडावं लागलं. 1990, 1995 आणि 2004 या तिन्ही खेपेला सेनेकडे 10, 8 आणि पुन्हा 8 अशा भाजपपेक्षा जास्त जागा होत्या आणि अलिखित नियमानुसार विरोधी पक्षनेतेपद हे त्या त्या वेळी सेनेलाच गेले. वर्ष 2009 ला तर भाजपला सेनेपेक्षा फक्त 1 जागा जास्त मिळाली आणि मोठ्या-छोट्या भावाचे नाते लगेच बदलले. सेनेनंही फार खळखळ न करता विरोधी नेतेपद ह्या एका जास्त जागेमुळे भाजपाला सुपूर्त केले होते.


VIDEO | सरकार लवकर स्थापन होणे गरजेचं, शिवसेनेने अवास्तव मागणी करु नये : रामदास आठवले



वर्ष         पक्ष (जागा)                     फरक


1990 =  सेना (52), भाजपा (42)    10 

1995 = सेना (73), भाजपा (65)       8  (शिवसेनेचा मुख्यमंत्री, भाजपकडे उपमुख्यमंत्रिपद)

1999 = सेना (69), भाजपा (56)    13 

2004 = सेना (62), भाजपा (54)     8

2009 = सेना (45), भाजपा (46)     1  (भाजपकडे विरोधीपक्षनेतेपद)

2014 = सेना (63), भाजपा (122)  59

2019 = सेना (56), भाजपा (105)  49


 1999 ला सरकार बनवायची वेळ आली तेव्हा फक्त 13 जागा जास्त असलेल्या शिवसेनेकडेच पूर्ण 5 वर्ष मुख्यमंत्रीपद होते. आज मात्र 49 जागांनी वरचढ असलेल्या भाजपकडे शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी हट्ट करत असल्यानं पेच उभा राहिला आहे. युतीच्या या इतिहासात कितीही राजकारण असलं, तरी मैत्रीही होती आणि त्यामुळेच लिखित आश्वासांनांचा व्यवहार नव्हता. आज मात्र हे चित्र बदलताना दिसतंय.



देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांमध्ये युतीची चर्चा करताना भाजप स्वाभाविकच या इतिहासाचा दाखला देईल. ज्यात 5 वर्ष सेनेचा मुख्यमंत्री असताना भाजपचा उपमुख्यमंत्री होता. त्यामुळे यंदाही उपमुख्यमंत्रीपद हे सेनेला देणं या इतिहासाशी सुसंगत ठरेल. मात्र, जर मुख्यमंत्री पदाची विभागणी करायची म्हटल्यास, जुना इतिहास पुसून नवीन अध्यायच लिहावा लागेल.


VIDEO | राजकारणात कोणीच कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो : अजित पवार