पुणे : युती होणारच होती, यात काही आश्चर्य नाही, सत्तेच्या गादीची ऊब दोघांनाही सोडायची नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना-भाजपला कानपिचक्या लगावल्या आहेत. युतीला महाराष्ट्रात 45 काय, 48 जागा मिळतील, असा खोचक टोलाही पवारांनी लगावला.


युती होणारच होती. यात काही आश्चर्य नाही. दोघांचाही युती करण्याचा निर्धार होता. सत्तेच्या गादीची उब दोघांनाही सोडायची नव्हती. युतीला 45 जागा मिळतील असा दावा युतीचे नेते करत आहेत, युतीला 45 नाही तर 48 जागा मिळतील, बारामतीची जागाही त्यांनाच मिळेल, असा खोचक टोला शरद पवारांनी शिवसेना भाजपला लगावला.

आधी शिवसेना-भाजपने एकमेकांना शिव्या घातल्या, आता गळ्यात गळे घालून फिरत आहेत. मात्र महाराष्ट्राची जनता समजूतदार आहे. ते समंजसपणे निवड करतील आणि दिशाभूल करणाऱ्यांना योग्य तो रस्ता दाखवतील, असा विश्वासही पवारांनी व्यक्त केल्या.

लोकसभा निवडणुकीला अजित पवार, पार्थ पवार किंवा रोहित पवार यांच्यापैकी कोणीही उभं राहणार नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. पवार कुटुंबातील चार सदस्य लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरण्याच्या चर्चा होत्या. मात्र सुप्रिया सुळे आणि शरद पवारच आता लोकसभा लढवणार असल्याचं समजतं.

'पुलवामामधील हल्ला देशावरचा हल्ला होता. हल्ल्यानंतर दोनच दिवसात केंद्र सरकारकडून सर्व पक्षांची बैठक बोलवण्यात आली. राष्ट्रीय प्रश्न म्हणून आम्ही सगळे हातातलं काम सोडून दिल्लीला गेलो. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदीच तिथे नव्हते. चौकशी केली तेव्हा समजलं की ते सभेसाठी यवतमाळ, धुळ्याला गेले आहेत.' असं म्हणत पवारांनी मोदींवरही टीका केली.

हल्ल्याविषयी दोन दिवस आधी गुप्तचर यंत्रणांनी माहिती दिली होती. पण पुढे त्यावर योग्य कारवाई करण्यात आली नाही.
सरकार कमी पडले, मात्र ही वेळ त्यावर चर्चा करण्याची नाही. सरकारच्या पाठीशी सर्वजण आहेत. सरकारने योग्य कारवाई करावी, अशी मागणीही पवारांनी केली.