मुंबई: लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांना ठाकरे गटाकडून शिवडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यांच्याऐवजी शिवडी विधानसभा मतदारसंघातून अजय चौधरी (Ajay Chaudhari) यांना उमेदवारी देण्यात आली होती. यानंतर सुधीर साळवी (Sudhir Salvi) यांनी शुक्रवारी संध्याकाळी लालबागमध्ये (Lalbaug) आपल्या समर्थकांचा मेळावा आयोजित केला आहे. त्यामुळे शिवडी विधानसभा मतदारसंघात (Shivadi Vidhan Sabha) राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर अजय चौधरी यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना मी सुधीर साळवी यांना भेटणार असल्याचे सांगितले.


सुधीर साळवी हे अनेक वर्षे शिवसेनेत काम करत आहेत. त्यामुळे उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांची नाराजी असू शकते. पण पक्षश्रेष्ठी, स्थानिक नेतृत्व त्यांची समजूत काढेल, असे मला ठामपणे वाटते. मी त्यांना जरुर भेटेन. आमच्यात काही वैर किंवा वितुष्ट नाही. राजकारणात काम करताना प्रत्येकाला वाटतं निवडणूक लढायला मिळाली पाहिजे. निवडणूक लढण्याची इच्छा हा काही गुन्हा नाही. शिवडी विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकणार, असे अजय चौधरी यांनी म्हटले. मात्र, आता लालबाग मार्केटमधील आजच्या मेळाव्यात सुधीर साळवी काय बोलणार, यावर पुढील गोष्टी अवलंबून असतील.


लालबाग मार्केटमध्ये सुधीर साळवींचा मेळावा


सुधीर साळवी यांनी गेल्या वर्षभरापासून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न सुरु केले होते. मध्यंतरी गणेशोत्सवाच्या काळात लालबागचा राजाच्या पायाशी सुधीर साळवी यांच्या नावाने भावी आमदार अशी चिठ्ठी ठेवण्यात आली होती. ही चिठ्ठी प्रचंड व्हायरल झाली होती. त्यामुळे शिवडी विधानसभेच्या उमेदवारीसाठी सुधीर साळवी यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. शिवडातील शिवसेनेचे शाखाप्रमुख आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही सुधीर साळवी यांना पाठिंबा दिला होता. मात्र, निष्ठेच्या बळावर अजय चौधरी हे मातोश्रीकडून पुन्हा शिवडीची उमेदवारी पदरी पाडून घेण्यात यशस्वी ठरले होते. सुधीर साळवी यांनी वेगळी राजकीय वाट निवडल्यास शिवडीत अजय चौधरी यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. महायुतीने अद्याप शिवडीतील उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे सुधीर साळवी यांच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 


आणखी वाचा


सुधीर साळवींच्या पोस्टरमधील ठळक लाल अक्षरातील 'निष्ठावंत' शब्दाने लक्ष वेधलं, मशाल की धनुष्यबाण, आज लालबागमध्ये काय घडणार?


शिवडीतून पत्ता कट झाल्यानंतर सुधीर साळवींची समर्थकांना भावनिक साद, संजय राऊत म्हणाले; काही हरकत नाही...