मुंबई : शिवडी विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार अजय चौधरी (Ajya Chaudhari) आणि सुधीर साळवी (Sudhir Salvi) यांच्यात उमेदवारीसाठी चुरस होती. मात्र, गुरुवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अजय चौधरी यांची उमेदवारी जाहीर केली. यानंतर शिवडीतील (Shivdi Vidhan Sabha) सुधीर साळवी यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून आले. आता सुधीर साळवी आपल्या समर्थकांशी जाहीर संवाद साधणार आहेत. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, सुधीर साळवी शिवसेनेपेक्षा वेगळे नाहीत. साळवी हे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि आमचे सहकारी आहेत. त्या मतदारसंघात शिवसेना पक्षप्रमुखांनी विद्यमान आमदार अजय चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. एखाद्या मतदारसंघात एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छुक असतात. मला वाटत नाही ते रागावले आहेत, इच्छा व्यक्त करणे हा काही गुन्हा नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
सगळा विचार करूनच अजय चौधरींना उमेदवारी
शिवडी विधानसभा मतदारसंघात स्थानिक शिवसैनिकांची मागणी होती की, नवा चेहरा हवा, याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, अशी मागणी आमच्यापर्यंत आलेली नाही. ती तुमच्यापर्यंत आली असेल. अजय चौधरी हे ज्येष्ठ आमदार आहेत. सगळा विचार करूनच उद्धव ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिली असल्याचे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले.
बोलू द्या, काही हरकत नाही बोलायला
सुधीर साळवे यांनी आज एका मेळाव्याच्या आयोजन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की मला तुमच्याशी बोलायचं आहे. याबाबत विचारले असता 'बोलू द्या, काही हरकत नाही बोलायला. शिवसैनिकांशी जर एखादा ज्येष्ठ शिवसैनिक संवाद साधतोय तर त्याचा फायदा शिवसेनेच्या उमेदवारालाच होणार आहे', असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
सुधीर साळवी काय निर्णय घेणार?
दरम्यान, सुधीर साळवी यांनी सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये सुधीर साळवी यांनी आपल्या समर्थकांना साद घातलीय. 'माझ्या प्रिय, शिवडी विधानसभेतील निष्ठावंत शिवसैनिकांनो, मला तुमच्याशी बोलायचं आहे!', असा मजकूर या पोस्टमध्ये लिहिला आहे. शुक्रवारी सायंकाळी 7.30 वाजता लालबाग मार्केटमधील शिवसेना शाखेजवळ सुधीर साळवी हे आपल्या समर्थकांशी जाहीर संवाद साधतील. यावेळी ते नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा