अहमदनगर: विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून बहुतांश मतदारसंघात आपल्या पक्षाला जागा न सुटल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तसेच, इच्छुक उमेदवारांकडून बंडखोरीही करण्यात येत आहे. बंडखोर उमेदवारांच्या नेतृत्वात स्थानिक नेतेमंडळी व पदाधिकारीही आक्रमक भूमिका घेऊन पक्ष सोडण्याचा विचार करताना दिसून येतात. काही ठिकाणी पक्षातून बंडखोरी केल्यानंतर दुसऱ्या पक्षातही जाण्याचा निर्णय घेतला गेल्याचे दिसून येते. महाविकास आघाडीचे (MVA) व महायुतीमध्ये अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील नगर शहर विधानसभेच्या जागेवरुन शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. 


जिल्ह्यातील नगर शहर विधानसभेच्या जागेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दावा केला होता. अनेक वर्षांपासून शहरात शिवसेनेचा उमेदवार असल्याने ही जागा सेनेला मिळावी, अशी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटपात नगरची ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला गेल्याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं.  येथील महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख आशा निंबाळकर तसेच शहर प्रमुख अरुणा गोयल यांच्यासह शिवसेना महिला पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेला रामराम करत थेट राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी, महिला कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं.  
शिवसेना पक्ष कोणत्याही निर्णयात महिला पदाधिकाऱ्यांना विचारात घेत नसल्याने या महिला पदाधिकाऱ्यांनी महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे, येथील लढतीत आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढली असून सध्या येथील जागेवर विद्यमान आमदार हेही संग्राम जगतापच आहेत. 


काय आहे राजकारण


महाविकास आघाडीच्यावतीने नगर शहर विधानसभेची जागा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे अभिषेक कळमकर यांना देण्यात आली आहे. वास्तविक नगर शहर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असताना देखील ही जागा राष्ट्रवादीला दिल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी पाहायला मिळते आहे. त्यामुळे, शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन नाराजी व्यक्त केली होती. तसेच, येथील मतदारसंघात कार्यकर्त्यांनी उमेदवारी करण्याचा निर्णयही घेतला होता. शिवसेना ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी राजीनामे देणार असल्याचंही शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी यापूर्वीच सांगितलं होतं. त्यामुळे , महिला पदाधिकाऱ्यांनंतर आता पुरुष नेतेमंडळी काय निर्णय घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 


हेही वाचा


आधी रेल्वे सुटली, पुन्हा हल्लेखोर समजून कार्यकर्त्यानी मारलं, पोलिस तपासातून वेगळंच सत्य समोर आलं