सिंधुदुर्ग : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळीकडेच वातावरण तापलं आहे. त्यातच, यंदा राज्यातील प्रमुख पक्षांमध्ये तिहेरी ऐकी झाल्याने अनेकांच्या स्वप्नांवर पाणी फेरल्या गेल्याचं पाहायला मिळत आहे. महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये थेट सामना होत असून उमेदवारी अर्ज भरताना अनेकांनी पक्षासोबत बंडखोरी करत आपला रोष व्यक्त केला आहे. आता, बंडखोरांना शांत करण्याचं काम वरिष्ठांकडून होत आहे. वरिष्ठ नेत्यांकडून मनधरणी आणि इतर पदांची स्वप्ने दाखवत बंडखोरांना पुन्हा पक्षात सक्रीय होण्यासाठी गळ घातली जात आहेत. कोकणातील सावंतवाडी (Sawantvadi) मतदारसंघात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात भाजपमधूनच बंडखोरी झाली आहे. येथील भाजपचे पदाधिकारी विशाल परब यांनी बंडखोरी केली असून आज त्यांच्या गाडींचा ताफा जात असताना वेगळीच घटना घडलीय.
सावंतवाडी मतदारसंघातून बंडखोरी करत उभे ठाकलेले विशाल परब यांच्या वाहनावर अज्ञाताकडून हल्ला झाल्याने खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी घटनेचा सखोल तपास केला असता संशयित तरुण वेडसर असून त्याने कोणत्याही गाडीवर हल्ला केला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सखोल चौकशी करून त्याला नातेवाईकांच्या ताब्यातही देण्यात आले. मात्र, या तरुणाला कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण झाल्याची घटनाही समोर आली आहे.
मारहाण झालेला तरुण हा कणकवली येथील चिरेखाणीत कामाला आहे. मुळात हा हल्ला नसून कणकवलीकडे जाण्यासाठी वाहन थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिरेखाण कामगारालाच हल्लेखोर म्हणून बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार सहानुभूतीसाठी करण्यात आला का की अन्य काही याचा पोलिस शोध घेत आहेत. संशयित तरूण संजय गोप हा कणकवली येथील विरण गावातील चिरेखाणीमध्ये कामाला आहे. तो झारखंड रांची येथून मंगळवारी निघाला. त्याच्या सोबत विनोद गोप हा नातेवाईक होता. संजय हा सावंतवाडी रेल्वे स्थानक येथे लघु शंकेसाठी उतरला अन् रेल्वे चुकली. मात्र, जवळ पैसे नसल्याने तो रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांना हात दाखवून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या हातात काठी होती.
कार्यकर्त्यांकडून मारहाण
दरम्यान, मळगाव रस्त्यावरून अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्या गाड्या जात होत्या. या गाड्या थांबवण्याचा प्रयत्न संजयने केला. गाडी थांबल्यावर त्या गाडीतून काही माणसे उतरल्यावर त्याने घाबरून पळ काढला. दरम्यान, त्याला कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याची माहिती आहे. हा तरुण गाडीवर हल्ला करत असल्याचा संशय घेऊन त्यास मारहाण करण्यात आली. मात्र, पोलिसांनी चौकशी केली असता हा तरूण थोडा वेडसर असल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा
Amit Thackeray: दीपोत्सव मनसेचा, अमित ठाकरेंच्या उपस्थितीला आक्षेप; ठाकरेंच्या उमेदवाराने दाखवलं बोट