मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना होत आहे. त्यातच, मनसेनेही यंदा मोठ्या प्रमाणात उमेदवार मैदानात उतरवले असून वंचित बहुजन आघाडीनेही (Vanchit) राज्यातील बहुतांश मतदारसंघात आपले उमेदवार दिले आहेत. त्यामुळे, वंचितची टीमही निवडणुकांसाठी प्रचाराच्या मैदानात उतरली आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash ambedkar) यांना आज सकाळी अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे वंचितच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, बाळासाहेबांची म्हणजेच प्रकाश आंबेडकरांची तब्येत ठीक असून तुम्ही तुमचे मतदारसंघ सांभाळा, असे आवाहन वंचितचे युवा नेते आणि प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी केले आहे. बाळासाहेब यांच्यावर उद्या ॲन्जिओप्लास्टी करण्यात येणार आहे, ॲन्जिओग्राफीत एक छोटा ब्लाॅक आढळून आल्यानंतर उद्या शस्त्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती देखील सुजात आँबेडकर यांनी दिली.

  


मीडियाच्या माध्यमातून मी मीडिया आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो की, इकडे खूप मोठी डॉक्टरांची टीम आहे, सपोर्टीग स्टाफ आहे, जो बाळासाहेबांची काळजी घेत आहे. त्यामुळे हॉस्पिटल आणि स्टाफ यांना त्रास होईल अशी कोणतीही कृती करू नका. माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की, आपापले मतदारसंघ सांभाळा, ते सोडू नका आम्ही सर्व बाळासाहेबांच्या सोबत असल्याचे वंचित बहुजन युवा आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी म्हटले आहे.


पुढे बोलताना सुजात आंबेडकर यांनी म्हटले आहे की, काल रात्री बाळासाहेबांना छातीत दुखत होते आणि अस्वस्थ वाटत होते. म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची अँजीओग्राफी करण्यात येणार आहे. त्यानंतर जो रिपोर्ट येईल त्यानुसार पुढील उपचार डॉक्टर कळवतील तसे आम्ही तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून कळवू. आम्ही डॉक्टरांच्या रिपोर्टसाठी थांबलो आहोत. जसा रिपोर्ट येईल तशी माहिती बाळासाहेबांच्या आणि वंचितच्या हॅण्डलवरून कळवण्यात येईल. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने गुरुवारी पहाटे (३१ ऑक्टोबर) पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, येत्या तासाभरात त्यांची अँजिओग्राफी करण्यात येणार असल्याचेही वंचित बहुजन आघाडीच्या ट्विटर हॅण्डलवरून कळवण्यात आले आहे.


हेही वाचा


देवेंद्र तात्यांनी मला खूप काही शिकवलं; मनोज जरांगेंचं ठरलं, गणित जुळलं, सांगितला विजयाचा फॉर्म्युला