बारामती: राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस ही महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचे सांगतात. आपण सगळे सरकार आणि अर्थमंत्र्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवत असतो. पण विधानसभा निवडणूक संपल्यानंतर एक-दोन महिन्यांमध्ये राज्याची खरी आर्थिक स्थिती समोर येईल, असे वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar)  यांनी केले. ते शनिवारी बारामतीच्या गोविंद बागेतील मेळाव्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. 


यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाच्या अहवालाबाबत भाष्य केले. या अहवालात देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची आर्थिक क्षेत्रातील कामगिरी खालावल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. सध्या राज्यातील सत्ताधाऱ्यांनी काही योजनांसाठी गरीबांसाठी असणाऱ्या योजनांचा निधी वळविला आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून गरीबांच्या पदरात काहीही पडलेले नाही, असा आरोप शरद पवार यांनी केला.


मला महाराष्ट्राच्या आजच्या स्थितीची चिंता वाटते. कारण काही महत्त्वाचे प्रश्न हाताळायला सध्याच्या राज्यकर्त्यांना अपयश आलं आहे. केंद्र सरकार अर्थखात्याशी संबंधित एका विभागाने आर्थिक कामगिरीच्या जोरावर देशातील राज्यांचे रँकिंग जाहीर केले आहे. जे राज्य एकेकाळी क्रमांक एकला होते, ते पहिल्या पाचमध्ये नाही. याशिवाय, उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नासंदर्भातही महाराष्ट्रासाठी धक्कादायक परिस्थिती आहे. हा पंतप्रधानांसोबत काम करणाऱ्या लोकांनी तयार केलेला अहवाल आहे. अर्थव्यवस्था मजबूत करायला जी काही पावल टाकली पाहिजेत त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नुसतं राजकारण करुन प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे परिस्थिती किती गंभीर आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले. 


या सगळ्यातून मार्ग काढायचा असेल तर सत्तेमध्ये परिवर्तन करण्याशिवाय पर्याय नाही. राज्यात बदल झालाच पाहिजे. ज्यांच्यात बदल घडवायची ताकद असली पाहिजे, त्यांना जनतेने सत्तेत आणले पाहिजे. आपण सामूहिक प्रयत्नाने परिवर्तन आणू शकतो, हाच निर्धार पाडव्याच्या दिवशी केला पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले. 


अजित पवारांना शरद पवारांचा टोला


अजित पवार यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर.आर. पाटील यांनी केसाने आपल्या गळा कापल्याचे वक्तव्य केले होते. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, सिंचन घोटाळ्याचा उल्लेख आम्ही कोणी केलेला नव्हता. हा मुद्दा कोणी काढला हे सांगायची गरज नाही. पण एकाच गोष्टीचं वाईच वाटतं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अत्यंत स्वच्छ व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचं नावलौकीक होतं. अशा स्वच्छ, राजकारणी आणि नेत्याबद्दल त्यांच्या पश्चात्य उलटी-सुलटी चर्चा होणं हे अशोभनीय आहे. हे घडलं नसतं तर आंनद झाला असता. जी व्यक्ती जाऊन नऊ नर्ष झाली आणि त्यांचा लौकिक संपुर्ण देशामध्ये एक अत्यंत स्वच्छ आणि प्रामाणिक नेता त्यांच्यासंबधी अशी चर्चा होणं हे योग्य नाही. पण, सत्ता हातात असल्यानंतर आपण काही बोलायला मुक्त आहोत. हा समज काही लोकांचा असतो. कदाचित त्याचाच हा एक भाग असेल, असे शरद पवार यांनी म्हटले.


आणखी वाचा


अजित पवारांनी आर आर आबांवर आरोप केल्यानंतर शरद पवारांकडून पहिल्यांदाच भाष्य