मुंबई: मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार शायना एन. सी. यांनी ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांनी आपला उल्लेख 'माल' असा केल्याचा आरोप केला होता. शायना एन. सी. (shaina nc) यांनी याप्रकरणात पोलीस तक्रारही दाखल केली होती. यावरुन शुक्रवारी दिवसभर वातावरण तापले होते. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर  पलटवार केला आहे. काही वर्षांपूर्वी भाजपचे प्रमुख नेते हे सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याविषयी काय बोलायचे, हे भाजप नेत्यांनी आठवून पाहावे, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते शनिवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.


भाजपचे नेते पूर्वी सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांना इम्पोर्टेड माल बोलायचे. भाजपच्या त्यावेळच्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी हा शब्द वापरला आहे. अरविंद सावंत हे जबाबदार नेते आहेत. शायना एन सी यांच्याबाबत बोलताना त्यांनी माल हा शब्द वापरला. मुंबादेवीत आयात केलेल्या नेत्यांबद्दल ते बोलत होते. शायना एनसी बाहेरुन आल्या आहेत, त्यांना विरोध होत आहे, असा अरविंद सावंत यांच्या बोलण्याचा अर्थ होता. ते बोलण्याच्या ओघात काही बोलले असतील, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. मात्र, निवडणुकीच्या काळात शायना एन सी यांच्याकडून या गोष्टींचे  भांडवल केले जात आहे. पंतप्रधान मोदी हे स्वत: सोनिया गांधी यांच्या वैध्यव्याविषयी आणि त्यांच्या जन्मस्थानाविषयी काय बोलले आहेत, हे सगळ्यांना ठाऊक आहे. शायना एन सी यांचा मुंबादेवीतून पराभव होताना दिसत असल्याने त्या प्रसिद्धीसाठी अशाप्रकारची वक्तव्यं करत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.


देवेंद्र फडणवीसांवर कोण हल्ला करणार आहे? संजय राऊतांचा सवाल


देवेंद्र फडणवीस यांना कोणापासून धोका आहे? त्यांच्या सुरक्षेत इतकी वाढ का करण्यात आली आहे? महाराष्ट्र आणि सागर बंगल्यावर इस्रायल किंवा युक्रेन हल्ला करणार आहे का? देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांना कोणापासून धोका आहे? त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेमुळे धोका आहे का?  जे फोर्स वन पथक दहशतवादी हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी तयार करण्यात आले होते, त्या पथकातील जवान देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेसाठी सागर बंगल्यावर तैनात करण्यात आले आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.



आणखी वाचा


'इम्पोर्टेड माल' खासदार अरविंद सावंतांच्या अंगलट; शायना एनसीच्या तक्रारीवरून मुंबईत गुन्हा दाखल