बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि दिवंगत नेते आर आर पाटील यांच्यावर काही दिवसांपुर्वी गंभीर स्वरूपाचे आरोप केले. आर आर आबांनी केसाने गळा कापला, असंही अजित पवार म्हणाले होते. त्यावरून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया समोर आल्या. मात्र, आज अजित पवारांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.


काय म्हणाले शरद पवार?


सिंचन घोटाळ्याचा उल्लेख आम्ही कोणी केलेला नव्हता. हा मुद्दा कोणी काढला हे सांगायची गरज नाही. पण एकाच गोष्टीचं वाईच वाटतं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अत्यंत स्वच्छ व्यक्तीमत्व म्हणून ज्यांचं नावलौकीक होतं. अशा स्वच्छ, राजकारणी आणि नेत्याबद्दल त्यांच्या पश्चात्य उलटी-सुलटी चर्चा होणं हे अशोभनीय आहे. हे घडलं नसतं तर आंनद झाला असता. जी व्यक्ती जाऊन नऊ नर्ष झाली आणि त्यांचा लौकिक संपुर्ण देशामध्ये एक अत्यंत स्वच्छ आणि प्रामाणिक नेता त्यांच्यासंबधी अशी चर्चा होणं हे योग्य नाही. पण, सत्ता हातात असल्यानंतर आपण काही बोलायला मुक्त आहोत. हा समज काही लोकांचा असतो. कदाचित त्याचाच हा एक भाग असेल, असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांचं नाव न घेता टोला लगावला आहे. 


नेमकं काय म्हणाले होते अजित पवार? 


70 हजार कोटी रुपयांचे घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर कारवाई करण्यासाठी फाईल गृह मंत्रालयाकडे गेली होती. त्यावेळी गृहमंत्री असणारे आर. आर. पाटील यांनी माझी खुली चौकशी करावी असे सांगत फाईलवर सही केली होती. त्यानंतर सरकार गेलं. राष्ट्रपती राजवट लागू झाली. मात्र, माझ्या सहीवर राज्यपालांनी सही केली नाही. सरकार बदललं 2014 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मुख्यमंत्री म्हणून कारवाई करण्यासाठी माझ्या फाईलवर सही केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बंगल्यावर मला बोलवून आर आर पाटील यांनीच तुमची खुली चौकशी करावी असे आदेश देत सही केल्याचे दाखवलं. ज्याच्यावर एवढा विश्वास ठेवला. एवढं सहकार्य केलं. त्याच आर आर पाटील यांनी माझा केसाने गळा कापला होता, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तासगावमध्ये बोलताना केला. 


आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची मागितली माफी - सुळे


मी आर. आर. पाटील यांच्या कुटुंबाशी चर्चा केली. मी त्यांना सॉरी म्हटले. कारण मला खूप दुःख झाले आहे. आज त्यांची आई, त्यांची पत्नी, मुलं त्यांना या आरोपांमुळे काय वाटलं असेल? हे वाटूनच मी त्यांना सॉरी म्हटलं. आर. आर. पाटील इमानदार नेते होते. विरोधकांनी मागणी केल्यानंतर त्यांनी चौकशीसाठी संमती दिली कारण जर आरोप खोटे असतील तरीही ते झाले आहेत त्यामुळे आर. आर. पाटील यांनी निष्पक्षपणे चौकशी लावली असेल ही बाब कौतुकास्पद आहे. मात्र, आता आरोप होणं वेदनादायी असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं.