पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि विरोधकांसह शरद पवारांवर जोरदार टीका केली होती. फुटीरतावादी लोकांसोबत शरद पवार उभे आहेत. शरदराव तुम्ही अशा लोकांसोबत उभे आहात, तुम्हाला हे शोभत का? राजकारण वेगळी गोष्ट मात्र शरद पवार तिकडं शोभत नाहीत, अशा शब्दात मोदींनी पवारांवर निशाणा साधला होता. यावर उत्तर देताना पवार म्हणाले की, संसद, घटना, रिझर्व्ह बँक, न्यायालय अशा सर्व प्रकारच्या घटनात्मक संस्थांवर हल्ला मोदी सरकारने केला आहे. असे होत असेल तर सरकार कोणासाठी चालवले जात आहे हे कळत नाही. देशात हुकूमशाही आणण्याचा यांचा डाव आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केली. आम्ही अन्य काही सहन करू पण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या घटनेला हात लावलेले खपवून घेतले जाणार नाही. तुमचे सरकार उलथवून टाकू. विस्तावाशी खेळू नका, अशी मोदींवर टीका करतानाच हा आपल्याला प्रेमाचा सल्ला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
VIDEO | मोदी इतरवेळी ठिक असतात, मात्र निवडणुका आल्या की त्यांच्या अंगात येतं : शरद पवार | एबीपी माझा
ज्या घरात दोन हत्या होऊनही पुढची पिढी जबाबदारी झटकत नाही, त्या गांधी घराण्याला तुम्ही काय केलं म्हणून विचारता? पण तुम्ही काय दिवे ते पहिल्यांदा सांगा, अशा शब्दात शरद पवार यांनी उल्हासनरच्या सभेत मोदींवर निशाणा साधला होता. 'राजीव गांधी यांनी देशाला विज्ञान, तंत्रज्ञानात पुढे नेलं. त्यामुळेच आज खेड्यापाड्यात महिलांच्या हातात मोबाईल दिसतो. गांधींच्या घरात इंदिरा गांधींची हत्या झाली, त्यावेळी राजीव गांधी समोर आले. राजीव गांधींची हत्या झाली त्यावेळी सोनिया गांधी पुढे आल्या. आता राहुल गांधींनी जबाबदारी घेतली आहे. गांधी घराण्याची पुढची पिढी कधीच जबाबदारी झटकत नाही. मात्र मोदी त्यांना विचारतात तुम्ही काय केलं? पण पहिल्यांदा आपण काय दिवे लावले ते सांगा. उगाचच इतरांवर आरोप करु नका' अशा शब्दात शरद पवारांनी नरेंद्र मोदींना जाब विचारला होता.
मोदी सैनिकी कारवायांचं श्रेय घेत असल्याच्या आरोपाचाही पवारांनी पुनरुच्चार केला. मोदी ठिकठिकाणी सांगतात दहशतवाद्यांचा बंदोबस्त मीच करतो, कारण माझी छाती 56 इंचाची आहे. अभिनंदनलाही आम्हीच परत आणल्याचा दावा भाजपवाले करतात. मात्र अडीच वर्षांपासून कुलभूषण जाधव पाकिस्तानकडे आहे. त्याला का नाही सोडवलं? आता कुठे गेली तुमची 56 इंचाची छाती? असा सवाल करत पवारांनी मोदींवर खरमरीत टीका केली होती.