मुंबई : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर आता सहकारी संस्था विशेषत: बाजार समित्यांच्या (Bajar samiti) निवडणुकांचा बिगुल वाजणार होता. त्या अनुषंगाने राजकीय पक्षाच्या स्थानिक नेतेमंडळींची राजकीय लबगबही सुरू झाली होती. मात्र, सहकार खात्याने आणखी एकदा निवडणुका (Election) पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, आता सहकारी संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी पावसाळ्यानंतरच सुरू होईल असे दिसून येते. पावसाचा (Rain) हंगाम संपेपर्यंत म्हणजेच 30 सप्टेंबर 2024 प्रर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील जवळपास 8305 सहकारी संस्थांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.


नव्या वर्षात निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्था तसेच आतापर्यंत पुढे ढकलण्यात आलेल्या सुमारे 38 हजार 740 सहकारी संस्थांच्या निवडणुकांना राज्य सरकारने यापूर्वी 31 मेपर्यंत स्थगिती दिली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. त्यापैकी 10 हजार 783 निवडणुकांची प्रक्रिया सुरू असतानाच हा सहकार पणन विभागाने यासंदर्भात स्थगितीचे आदेश काढले होते. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून राज्यातील सुमारे 27 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या वर्षभरात करण्याचे आदेश देण्यात आले होते. राज्यात 31 डिसेंबर 2023 अखेर निवडणुकीसाठी पात्र असलेल्या 93 हजार 342 सहकारी संस्थांपैकी 50 हजार 238 सहकारी संस्थांची निवडणूक पूर्ण झाली आहे. उर्वरित सहकारी संस्थांपैकी 10 हजार 783 सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होती. यंदाच्या 2024 या वर्षात 7 हजार 827 सहकारी संस्था निवडणुकांसाठी पात्र ठरत असल्याने या सर्व 38 हजार 740 सहकारी संस्थांची निवडणूक सहकार विभागाला घ्यावी लागणार आहे. मात्र, आधी लोकसभा निवडणुकांचे कारण देत ह्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता, पावसाचे कारण देत ह्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 


राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत. शेतीची पेरणी आणि पावसाचं कारण दाखवत सरकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पावसाचा हंगाम संपेपर्यंत म्हणजेच 30 सप्टेंबर 2024 प्रर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सहकार विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील जवळपास 8305 सहकारी संस्थांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. याआधीही अनेक कारणे दाखवत सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता, पुन्हा एकदा या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने विद्यमानं संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली आहे, असेच म्हणता येईल. 


याअगोदर 31 मे पर्यंत पुढे ढकलल्या होत्या


दरम्यान, देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असताना उच्च न्यायालयाने निवडणुकांचे आदेश दिलेल्या निवडणुका वगळून सहकार विभागाने येत्या 31 मे 2024 पर्यंत सरसकट सगळ्या संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली होती. मात्र, सर्वोच्च व उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिलेल्या सहकारी संस्था वगळून राज्यातील अन्य सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका या आदेशाच्या तारखेपासून ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर स्थगित करून 31 मेपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहेत, असेही यापूर्वीच्या आदेशात नमूद केले होते. आता, 30 सप्टेंबरपर्यंत पुन्हा निवडणुका पुढे ढकलण्यातआल्या आहेत.