T20 World Cup 2024 IND vs AFG: आज  भारत आणि अफगाणिस्तान (Ind vs Afg) एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. टी20 विश्वचषक 2024सुपर-8 फेरीचा हा सामना बार्बाडोसमध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता खेळवला जाईल. अफगाणिस्तानचे सुपरस्टार मोहम्मद नबी आणि राशिद खान यांच्यावर भारतीय चाहत्यांची नजर असेल. वास्तविक, दोन्ही खेळाडू एकहाती सामना फिरण्यासाठी सक्षम आहेत. परंतु या दोघांशिवाय भारतीय संघाला अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा सलामीवीर आणि यष्टिरक्षक रहमानउल्ला गुरबाजपासून सावध राहावे लागेल. रहमानउल्ला गुरबाज टीम इंडियासाठी मोठा धोकादायक ठरु शकतो.


वास्तविक, या टी-20 विश्वचषकात रहमानउल्ला गुरबाज चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. रहमानउल्ला गुरबाज हा या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू आहे. विशेषत: रहमानउल्ला गुरबाजला पॉवरप्लेच्या षटकांत रोखणे हे विरोधी गोलंदाजांसमोर मोठे आव्हान आहे. टी-20 विश्वचषक 2024 मध्ये रहमानउल्ला गुरबाजने 4 सामन्यात 150 च्या स्ट्राईक रेटने 167 धावा केल्या आहेत. आत्तापर्यंत अफगाणिस्तान संघ टी-20 फॉर्मेटमध्ये भारताला पराभूत करू शकला नाही, परंतु आज अफगाण संघाला इतिहास रचण्याची संधी आहे. सध्या अफगाणिस्तानच्या फलंदाजांव्यतिरिक्त गोलंदाजही आपली कामगिरी चोख बजावत आहेत.


रहमानउल्ला गुरबाजची कारकीर्द-


रहमानउल्ला गुरबाजच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली तर 59 टी-20 सामन्यांव्यतिरिक्त त्याने 40 वनडे आणि 1 कसोटी सामन्यात अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. रहमानउल्ला गुरबाजच्या नावावर टी-20 फॉरमॅटमध्ये 1543 धावा आहेत. तर या यष्टीरक्षक फलंदाजाने एकदिवसीय सामन्यांमध्ये 1464 धावा केल्या आहेत. याशिवाय रहमानउल्ला गुरबाजने आयपीएलच्या 14 सामन्यात 289 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे आयपीएलमध्ये खेळण्याच्या अनुभवामुळे रहमानउल्ला गुरबाज आणि अफगाणिस्तानचे काम सोपे होईल, असे मानले जात आहे. मात्र, भारतीय संघाविरुद्ध अफगाणिस्तानची कामगिरी कशी होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


भारताचा संपूर्ण संघ:


रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, यशस्वी जैस्वाल, कुलदीप यादव, संजू सॅमसन , युझवेंद्र चहल


अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ:


रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झदरन, गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, करीम जनात, रशीद खान (कर्णधार), नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी, फरीद अहमद मलिक, मोहम्मद इशाक, नांगेलिया खरोटे, हजरतुल्ला झाझाई



संबंधित बातम्या:


T20 World Cup 2024 IND vs AFG: भारत अन् अफगाणिस्तानच्या सामन्यात पावसाची बँटिंग?; बार्बाडोसमध्ये याआधी रद्द झाला होता एक सामना


Net Worth Of Gautam Gambhir: क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही कमाईत चौकार-षटकार; गौतम गंभीरची संपत्ती किती?