मुंबई: हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजप सत्तेतून पायउतार अशी जोरदार चर्चा असताना काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला होता. त्यामुळे महाराष्ट्रात सुरु असलेल्या महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेतील काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर कमी झाल्याची चर्चा सुरु झाली होती. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला (Congress) खडे बोल सुनावले आहेत. जिंकलेल्या डावाचे पराभवात रुपांतर कसं करायचं हे काँग्रेसकडून शिकायला हवे, अशी बोचरी टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती. एवढेच नव्हे तर काँग्रेसला स्वबळावर लढायचे असेल त्यांनी तशी भूमिका जाहीर करावी. जेणेकरुन इतर मित्रपक्ष आपला निर्णय घ्यायला मोकळे होतील,  असेही संजय राऊत यांनी म्हटले.


संजय राऊत यांच्या या थेट आव्हानंतर काँग्रेसच्या गोटातून तीव्र प्रतिक्रिया उमटतील, असा अंदाज होता. एरवी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे 'अरे ला कारे' करायला मागे पुढे पाहत नाहीत. मात्र, 'सामना'तील बोचरा अग्रलेख आणि संजय राऊत यांच्या थेट टीकेनंतरही अद्याप काँग्रेसच्या एकाही प्रमुख नेत्याने त्यांना प्रत्युत्तर दिलेले नाही. पृथ्वीराज चव्हाण, भाई जगताप आणि वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. या विषयावर आमचे प्रदेशाध्यक्ष बोलती, असे धोरण महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी स्वीकारले आहे. 


संजय राऊत नेमकं काय म्हणाले?


हरियाणा विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचा पराभव दुर्दैवी आहे. जम्मू-काश्मीरमध्ये इंडिया आघाडीचा विषय झाला. हरियाणात इंडिया आघाडीतील पक्ष एकत्रपणे लढले असते तर फायदा झाला असता. पण काँग्रेसला वाटलं आम्ही एकतर्फी जिंकू, आम्हाला कोणाची गरज नाही. जिथे काँग्रेस दुबळी आहे, तिथे ते प्रादेशिक पक्षांची मदत घेते. जिथे काँग्रेसला आपण मजबूत आहोत असे वाटते, तिकडे ते प्रादेशिक पक्षांना महत्त्व देत नाहीत. नाहीतर हरियाणात भाजपचा विजय होईल, असे सांगणारा एकही व्यक्ती मला भेटला नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.


हरियाणातील पराभवातून बऱ्याच गोष्टी शिकता येतील. देशातील निवडणुका एकत्रच लढाव्या लागतील. लोकसभेचं यश हे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे यश आहे. काँग्रेसला हरियाणात सत्तास्थापनेसाठी फक्त 9 जागा कमी पडल्या, 25 जागा कमी पडल्या नाहीत. पण आम्ही निराश झालेलो नाही. पण आता काँग्रेसला अनेक राज्यांतील निवडणुकीबाबत भूमिका घ्यावी लागेल. काँग्रेसला स्वबळावर लढायंच असेल तर त्यांनी भूमिका जाहीर करावी. मग इतर पक्ष आपापला निर्णय घेतील, असे संजय राऊत यांनी म्हटले.


संजय राऊतांच्या टीकेवर नाना पटोले काय म्हणाले?


संजय राऊत काय लिहितो काय बोलतो याला जास्त आम्ही महत्त्व देत नाही. हरियाणा  आणि महाराष्ट्रमधला ज्यांना फरक कळत  नाही त्यांच्या बद्दल काय बोलणार. मी त्यावरती जास्त  काही बोलणार नाही, वेळ आल्यावर योग्य ते उत्तर देऊ. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं समजून चला. महायुतीकडे जास्त लक्ष द्या, मुख्यमंत्र्यांची तब्येत वारंवार का खराब होते,  काय कारण आहे याचाही शोध घ्या, असे प्रत्युत्तर नाना पटोले यांनी राऊतांना दिले.


आणखी वाचा


जिंकलेल्या डावाचे पराभवात रुपांतर कसं करायचं हे काँग्रेसकडून शिकायला हवं; हरियाणातील पराभवानंतर संजय राऊतांनी जखमेवर मीठ चोळलं