लखनौ : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. संजय दत्त पुन्हा एकदा 'सायकल स्वारी' करणार असल्याचे बोलले जात आहे. संजय दत्त उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून समाजवादी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. वडील सुनील दत्त, बहिण प्रिया दत्त हिच्यानंतर संजय दत्तदेखील आता लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. परंतु संजय दत्त निवडणूक लढवू शकत नाही. दोन वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगवास भोगलेला गुन्हेगार भारतीय कायद्यानुसार लोकप्रतिनिधीपदास अपात्र असतो. संजय दत्तने तीन वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे संजय दत्त निवडणूक लढवू शकत नाही.
10 वर्षांपूर्वी संजय दत्तने समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. 2009 साली सपाच्या तिकिटावर संजय दत्त लखनौ येथून लोकसभा लढवणार होता. संजय दत्तने तशी घोषणादेखील केली होती. परंतु संजय ती निवडणूक काही कारणास्तव लढू शकला नाही. आता पुन्हा एकदा संजय दत्त लोकसभा लढवणार असल्याच्या बातम्या अनेक इंग्रजी आणि हिंदी वेबसाईट्सनी दिली आहे.
सपाचे नेते अमर सिंह यांच्या आग्रहामुळे संजय दत्तने 2009 मध्ये समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. परंतु नंतरच्या काळात अमरसिंह यांनी सपाला रामराम केल्यानंतर संजय दत्तनेदेखील पक्षाशी फारकत घेतली.
संजय दत्तचे वडील काँग्रेस खासदार होते. त्याची बहिण प्रिया दत्त या देखील काँग्रेसकडून खासदार झाल्या आहेत. परंतु संजयने समाजवादी पक्षाला जवळ केले आहे. समाजवादी पक्षाला गाझियाबादमध्ये केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह यांना टक्कर देण्यासाठी तगडा उमेदवार हवा आहे. त्यामुळे या जागेसाठी अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि अभिनेता संजय दत्त यांच्या नावांची चर्चा असल्याचे बोलले जात आहे.
संजय दत्त 'या' मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Mar 2019 06:32 PM (IST)
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. संजय दत्त पुन्हा एकदा 'सायकल स्वारी' करणार असल्याचे बोलले जात आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -