पणजी : गोवा काँग्रेसचे 4 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी केला आहे. यामुळे काँग्रेसला खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत भाजपमध्ये येणार अशी चर्चा आहे. आम्हाला मीडियामधूनच तस समजलं आहे. आमचा पक्ष सबका साथ सबका विकास या तत्वावर चालतो. त्यामुळे कामत येणार असतील तर त्यांचे स्वागतच आहे. त्याशिवाय राहुल गांधी, प्रियंका गांधी जरी भाजपमध्ये आली तरी आम्ही त्यांचे स्वागत करणार असे , भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी म्हटले आहे.
गोव्यात लोकसभेचे दोन आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे 3 उमेदवार निवडण्यासाठी भाजपच्या निवडणूक समितीची बैठक पार पडली. उत्तर गोव्यातून आयुष मंत्री श्रीपाद नाईक, दक्षिण गोव्यातून विद्यमान खासदार नरेंद्र सावईकर यांचीच नावे आल्याने ती नावे केंद्रीय समितीला पाठवली आहेत. विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिरोडा येथून सुभाष शिरोडकर तर मांद्रे मधून दयानंद सोपटे यांचे एकच नाव असल्याने ती नावे निश्चित करून पाठवण्यात आली आहेत. म्हापशात एका पेक्षा जास्त नावे असल्याने म्हापशाचा उमेदवार उद्या जाहीर केला जाईल. लोकसभेचे उमेदवार आज सायंकाळी जाहीर होणार असल्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने राज्यात राजकीय हालचाली बाढल्या आहेत. काल रात्री भाजपच्या सर्व आमदारांची तातडीची बैठक पार पडली. त्यात मुख्यमंत्र्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर मात करण्यासाठीच्या विविध पर्यायांवर चर्चा झाली. बैठकीत दिगंबर कामत यांच्या भाजप प्रवेशावर देखील चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
दिगंबर कामत आज सकाळीच दिल्लीस रवाना झाल्याचे कळताच कामत यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगू लागली होती. त्यात तेंडुलकर यांनी केलेल्या दाव्यामुळे गोव्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय उलथा पालथ होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दिगंबर कामत यांनी आपण वैयक्तिक कामासाठी दिल्लीस जात आहे. राजकीय कारण काही नाही. भाजप प्रवेशाच्या अफवांमध्ये तथ्य नाही. 4 दिवसांपूर्वी मी दिल्लीला गेलो होतो. आज देखील नेहमी प्रमाणे दिल्लीला जात असून सायंकाळी परत येणार असल्याचे कामत यांनी स्पष्ट केले आहे.
दिगंबर कामत यांच्या गटातील एक आणि आणखी एक आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा तेंडुलकर यांनी केल्यामुळे काँग्रेसच्या गोटात देखील अस्वस्थता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती शनिवारी जास्त बिघडली होती. मात्र आता ती स्थिर असल्याचा दावा भाजपच्या सगळ्या नेत्यांकडून केला जात आहे. मगो नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री ऑक्सिजनवर असून त्यांना रिकव्हर व्हायला वेळ लागणार आहे.
गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी आपल्या पक्षाच्या 3 आणि 3 अपक्ष आमदारांसोबत काल सायंकाळी मुख्यमंत्री पर्रिकर यांची भेट घेऊन आपण सर्व तुमच्या सोबत आहोत असा विश्वास व्यक्त केला होता. आज सकाळी मगोचे तिन्ही आमदार मुख्यमंत्र्यांना भेटले. आपली ही भेट कौटुंबिक होती त्यात राजकीय हेतू नव्हता असे ढवळीकर यांनी स्पष्ट केले आहे.
माजी मुख्यमंत्र्यांसह गोवा काँग्रेसचे 4 आमदार भाजपच्या वाटेवर, गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकरांचा दावा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Mar 2019 04:28 PM (IST)
त्याशिवाय राहुल गांधी, प्रियंका गांधी जरी भाजपमध्ये आली तरी आम्ही त्यांचे स्वागत करणार असे , भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी म्हटले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -