Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीतून जो संदेश दिला जातो तो राज्यभर पोहोचला जातो असं नेहमीच म्हटलं जातं आणि तसंच काहीसं राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये झालं आहे. राज्यांमध्ये महायुतीने घवघवीत यश मिळवताना एकहाती सत्ता मिळवली आहे. या एकहाती सत्तेमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा सुद्धा बहुमोल वाटा राहिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दहाच्या दहा जागा महायुतीच्या वाट्याला गेल्या आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून महाविकास आघाडी पूर्णतः हद्दपार झाली आहे. इतकेच नव्हे तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये चार जागा जिंकून काँग्रेसने बाजी मारली होती तोच काँग्रेस कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार झाला आहे. आमदार सतेज पाटील यांना मोठा झटका बसला असून कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ऋतुराज पाटील हे 18,131 मतांनी पराभूत झाले आहेत. हा पराभव सतेज पाटील यांच्या चांगलाच जिव्हारी लागणारा आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात कमळ फुलले
कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच लोकनियुक्त दोन आमदार करण्यात भाजपला यश आलं आहे. कोल्हापूर दक्षिण आणि इचलकरंजीमध्ये दोन्ही भाजप उमेदवार विजयी झाले आहेत. कोल्हापूर दक्षिणमध्ये खासदार धनंजय महाडिक वादात सापडूनही अमल महाडिक विजयी झाले आहेत. इचलकरंजीमध्ये राहुल आवाडे जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी विजयी झाले आहेत.
महायुतीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहापैकी दहा जागा
सतेज पाटील यांनी जागा वाटपामध्ये काँग्रेसकडे विद्यमान चार जागांसह शिरोळची जागा सुद्धा खेचली होती. मात्र, या सर्व जागांवर पराभवाचे धनी व्हावं लागलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी जिल्ह्यातून हद्दपार झाल्याची स्थिती आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 विधानसभा मतदारसंघ येतात. यामधील चंदगडमध्ये अपक्ष निवडून आला असला तरी तो सुद्धा भाजपचाच बंडखोर उमेदवार आहे. या ठिकाणी शिवाजी पाटील यांनी बहुरंगी लढतीमध्ये विजय मिळवत आमदारकी खेचून आणली आहे. त्यामुळे नंदिनी बाभूळकर आणि राजेश पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागलं आहे. त्यामुळे महायुतीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहापैकी दहा जागा मिळाल्या आहेत.
क्रमांक | विधानसभा मतदारसंघ | महायुती उमदेवार | महाविकास आघाडी | वंचित/अपक्ष/इतर | विजयी उमेदवार |
1 | कोल्हापूर दक्षिण | अमल महाडिक | ऋतुराज पाटील | अरुण सोनवणे | अमल महाडिक |
2 | कोल्हापूर उत्तर | राजेश क्षीरसागर | राजेश पाटील (पुरस्कृत) | राजेश क्षीरसागर | |
3 | करवीर | चंद्रदीप नरके | राहुल पाटील | संताजी घोरपडे | चंद्रदीप नरके |
4 | हातकणंगले | अशोकराव माने | राजू बाबा आवळे | सुजित मिणचेकर | अशोकराव माने |
5 | इचलकरंजी | राहुल आवाडे | मदन कारंडे | राहुल आवाडे | |
6 | शिरोळ | राजेंद्र पाटील यड्रावकर | गणपतराव पाटील | उल्हास पाटील | राजेंद्र पाटील यड्रावकर |
7 | शाहूवाडी-पन्हाळा | विनय कोरे | सत्यजित पाटील | विनय कोरे | |
8 | कागल-गडहिंग्लज | हसन मुश्रीफ | समरजितसिंह घाटगे | हसन मुश्रीफ | |
9 | चंदगड | राजेश पाटील | नंदाताई बाभुळकर | शिवाजी पाटील | शिवाजी पाटील |
10 | राधानगरी भुदरगड | प्रकाश आबिटकर | के. पी. पाटील | ए. वाय. पाटील |
प्रकाश आबिटकर |
राहुल आवाडेंना जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य
कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक इचलकरंजीमधील भाजप उमेदवार राहुल आवाडे यांना मिळालं असून 56 हजार 811 मताधिक्य मिळालं आहे. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मदन कारंडे यांचा पराभव केला.
कागलमध्ये मुश्रीफांचा षटकार
शरद पवार यांनी अत्यंत आक्रमकपणे दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या विरोधात प्रचार करत या गद्दारांना पाडा असेच आवाहन केलं होतं. शरद पवार यांच्या बहिण सरोज पाटील मात्र यांनी मुश्रीफांविरोधात प्रचार केला होता. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये जवळपास 28 हजार मतांनी मुश्रीफ विजय मिळवला होता. मात्र, यावेळी मताधिक्य कमी झाला असलं तरी विजय मिळवण्यात मात्र यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे समरजित घाटगे यांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे.
चंदगडमध्ये बंडखोराची बाजी
चंदगडच्या पंचरंगी लढतीत भाजप बंडखोर शिवाजी पाटील यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी अजित पवार गटाचे आमदार राजेश पाटील आणि शरद पवार गटाच्या नंदिनी बाभूळकर यांच्यासह दोन अन्य बंडखोर मानसिंग खोराटे आणि अप्पी पाटील यांना पराभवाचा झटका दिला.
राधानगरीत पहिल्यांदाच एखादा आमदाराची हॅट्ट्रिक
राधानगरी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे माजी आमदार के पी पाटील तुल्यबळ लढाई देतील असं वाटलं होतं. मात्र, विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांनी तब्बल 37 हजार 897 मतांनी त्यांचा पराभव करत तर आमदारकीची हॅट्रिक केली आहे. आबिटकर यांच्यामागे एकनाथ शिंदे यांनी बळ दिलं होते. केपी पाटील यांच्यासाठी सतेज पाटील यांनीही यंत्रणा लावली होती. मात्र, आबिटकर यांनी विजय खेचला आहे.
कोल्हापूर उत्तरच्या वादळात क्षीरसागरांचा दिवा
दोन अधिकृत उमेदवार देऊनही उमेदवारच नाही, अशी स्थिती झालेल्या काँग्रेसला कोल्हापूर उत्तरमध्ये तगडा झटका बसला आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये पहिल्या दहा ते बारा फेऱ्यांमध्ये मागे पडून सुद्धा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर यांनी विजय खेचून आणला आहे. काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांनी राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात तगडी झुंज दिली. मात्र, त्यांना पराभवाला सामोर जावं लागलं आहे. राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर उत्तरमधून 29 हजारांवर मतांनी विजय मिळवला आहे.
जनसुराज्यची बाजी, 100 टक्के स्ट्राईक रेट
जनसुराज्यकडून शाहुवाडीतून विनय कोरे यांनी पुन्हा एकदा बाजी मारली असून त्यांनी ठाकरे गटाच्या सत्यजित पाटील यांचा पराभव केला. हातकणंगलेमधून जनसुराज्यच्या अशोकराव माने यांनी काँग्रेसच्या राजू आवळे यांचा पराभव केला आहे. त्यामुळे जनसुराज्यला जिल्ह्यात दोन जागा मिळाल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या