कमी जागा जिंकल्या असतानाही शिवसेना थेट मुख्यमंत्रिपद आणि सत्तेच्या समसमान वाट्यासाठी अडून का बसली आहे? असाही प्रश्न विचारला जात होता. त्यासाठी, शिवसेना आणि भाजप युतीच्या ९०पासूनच्या निवडणुकांचे दाखलेही दिले गेले. यावर बोलताना राऊत म्हणाले की, सत्तेचं वाटप हे निवडून आलेल्या जागांवर नाही तर निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षात काय ठरलं होतं, यावर ठरतं. आमच्यातही सर्वकाही निवडणुकीपूर्वी ठरलं होतं. भाजपला जर १०५ जागा मिळाल्या, तर त्यात शिवसेनेचंही योगदान आहे आणि आम्हाला मिळालेल्या ५६ जागांमध्ये भाजपचं योगदान आहे. जर, हे मान्य नव्हतं तर (भाजपनं) जायचं होतं लढायला, आम्हीही गेलो असतो. तुम्ही आम्हाला कशाला फशी पाडलं युतीसाठी? आम्हाला गरज नसताना आम्ही युती केलेली आहे.
भाजपकडून शिवसेनेबद्दल आक्रमक भाषा वापरली जात नसताना, शिवसेनेतून फक्त संजय राऊतच आक्रमक भाषा वापरताहेत, यामुळे भाजप-सेनेतील 'पीस प्रोसेस'ला धक्का बसतोय का? या प्रश्नावर राऊत म्हणाले की, ही 'पीस प्रोसेस' नसून हक्काची लढाई आहे. भाजपचे इतर नेते बोलत नाहीत कारण त्यांनाही माहित आहे की, शिवसेनेची बाजू न्यायाची आहे. जे ठरलंय ते (शिवसेनेला) मिळायला पाहिजे. यातून आलेल्या 'गिल्ट'मुळे ते बोलायला तयार नाहीत.
भाजपला बहुमत सिद्ध करता न आल्यास ६३ आमदारांची शिवसेना १४४ जागांचं अंकगणित कसं जमवणार? या प्रश्नावर राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात वजाबाकी, गुणाकार, भागाकाराचं आणि बेरजेचंही राजकारण होतं. "...मात्र, बेरजेला महत्व आहे", अशा सूचक शब्दात त्यांनी भावी जुळवाजुळवीची चुणूक दाखवली.