रत्नागिरी/सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरु झालंय. सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघात यावेळी रंगतदार राजकीय लढत होणार आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पण हा बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचं मोठं आव्हान शिवसेनेसमोर असेल. विद्यमान खासदार आणि शिवसेना सचिव विनायक राऊत आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांच्यात लोकसभा निवडणुकीचा सामना रंगणार आहे. युती झाली तर भाजपची या मतदारसंघातील भूमिका, युती तुटली तर भाजपचा या मतदार संघातील चेहरा कोण आणि भाजपच्या तिकीटावर खासदार झालेल्या नारायण राणेंची भूमिका या सर्वांवर मतदारसंघाचा निकालाचा ठरणार आहे.


रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या निवडणूक निकालाचा इतिहास
राजकीयदृष्या अत्यंत संवेदनशील असा महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचा मतदारसंघ म्हणजे  सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघ. 2014 साली झालेल्या निवडणुकीचे आकडे आणि यावेळची समीकरणे यात बराच फरक पडला आहे. मात्र 2014 सालच्या  सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघात शिवसेनेचे खासदार विनायक राऊत दीड लाखांहून अधिकच्या फरकांनी निवडून आले. त्यावेळी काँग्रेस पक्षात असलेले नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांचा धक्कादायक पराभव झाला.

बॅरिस्टर नाथ पै, मुधुदंडवते अशा दिग्गजांचा मतदारसंघ म्हणजे सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ. गडचिरोलीनंतर सर्वात संवेदनशील लोकसभा मतदारसंघ म्हणून याची ओळख आहे. रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मिळून तयार झालेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात पाच शिवसेनेचे, तर एक काँग्रेसचा आमदार आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत 57.40 टक्के, 2014 ला 65.86 टक्के मतदान झालं होतं.


2014 निकाल



2014 च्या लोकसभा निवडणुकीची आकडेवारी धक्कादायक आहे. 2014 मध्ये शिवसेनेकडून सचिव विनायक राऊत यांना उमेदवरी देण्यात आली. त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून निलेश राणे यांना उमेदवारी दिली गेली. विनायक राऊत यांना 4 लाख 93 हजार 88 मते पडली. तर काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या निलेश राणे यांना 3 लाख 43 हजार 37 मते मिळाली. दीड लाखांहून अधिकच्या मतांनी विनायक राऊत निवडून आले.

निलेश राणे यांच्या 2014 मधील पराभवाची अनेक कारणे आहेत. त्यातील एक म्हणजे शिवसेनेतील एकजूट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील असमन्वय. 2014 मधल्या निवडणुकीतल्या आकडेवारीवरुन राणे यांच्या पराभवाची कारणे सांगितली जातात. शिवसेनेतील एकजूट आणि राष्ट्रवादीने राणे यांच्या विरोधात जाऊन केलेलं मतदान ही प्रमुख दोन कारणे आहेतच.  एकट्या केसरकरांच्या सावंतवाडीत 41 हजारांचं सर्वात जास्त मताधिक्य शिवसेनेच्या पारड्यात पडलं. त्यामुळेच राणेंचा पराभव झाला.


2009 साली झालेल्या निवडणुकीत मात्र पहिल्यांदाच उभ्या असलेल्या निलेश राणे यांनी बाजी मारली. शिवसेनेचे दिग्गज उमेदवार सुरेभ प्रभू यांना इथे पराभव पाहावा लागला. काँग्रेसकडून उभ्या असलेल्या निलेश राणे यांना 3 लाख 53 हजार 915 मते मिळाली. तर सुरेश प्रभू यांना 3 लाख 6 हजार 165 मतं पडली होती.

या निवडणुकीतील संभाव्य उमेदवार
आता पडघम वाजू लागतेलत ते आगामी निवडणुकीचे. महाराष्ट्रातील सर्वात राजकीय रंगतदार लढत ही सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची होण्याची शक्यता आहे. कारण, आपला बालेकिल्ला असणाऱ्या शिवसेनेला या निवडणुकीच्या निमित्ताने राणे यांचा प्रहार झेलावा लागणार आहे. या निवडणुकीत गेल्या निवडणुकीत निवडून गेलेले खासदार विनायक राऊत हेच पुन्हा शिवसेनेकडून उमेदवार असणार आहेत. तर राऊत यांच्याविरोधात पुन्हा एकदा नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे निवडणुकीत लढण्याच्या तयारीत आहेत. युती झाली नाही तर भाजपकडून कदाचित सुरेश प्रभू यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. मात्र सध्या तरी सुरेश प्रभू कोकणातून उमेदवारी लढवण्यासाठी इच्छुक नाहीत. भाजपकडून प्रसाद लाड इच्छुक असल्याची चर्चा आहे. मात्र भाजपने या मतदारसंघात उमेदवार दिला तरी नाणार रिफायनरीचा मुद्दा भाजपाला बॅकफूटवर टाकेल.


विधानसभा मतदारसंघांची रचना
सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघाची रचना पाहिली तर रत्नागिरी, चिपळूण, राजापूर हे रत्नागिरी जिल्ह्यातील तर सिंधुदुर्गातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी हे विधासभा मतदारसंघ येतात. रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, कुडाळ आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. तर कणकवली मतदारसंघात काँग्रेसकडून नितेश राणे निवडून गेलेत.


प्रचाराचे मुद्दे

लोकसभा निवडणुकीत प्रचाराचे मुद्दे पाहिले तर सर्वात मोठा मुद्दा येतो तो म्हणजे प्रस्तावीत नाणार ऑईल रिफायनरीचा. आशिया खंडातील सर्वात मोठी ऑईल रिफायनरीला स्थानिकांचा विरोध आहे. तर दुसरीकडे जैतापूर अणु ऊर्जा प्रकल्पालाही मच्छिमार आणि स्थानिकांचा विरोध आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण आणि कोकण रेल्वेचे दुपदरीकरण, कोकण रेल्वे पश्चिम महाराष्ट्राशी जोडणे, बंदरांचा विकास असे अनेक मुद्दे या निवडणुकीत असणार आहेत.नाणार ऑईल रिफायनरीला शिवसेनेचा विरोध आहे. हा रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यासाठी शिवसेनेच्या उद्योग मंत्र्यांनी अध्यादेश रद्द करण्याची घोषणा नाणारमध्ये येऊन केली. मात्र त्याची अंमलबजावणी नाही. त्यामुळे शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेल्या विनायक राऊत यांना थोडी अडचणीची ठरु शकते. शांत आणि संयमी स्वभाव, लोकांशी जनसंपर्क अशी ओळख असलेल्या विनायक राऊत यांची नाळ या मतदारसंघातील लोकांपर्यत पोहोचली आहे. मात्र हवा तसा विकासाचा चढता आलेख त्यांच्यापाशी नाही.उलट अत्यंत आक्रमक नेतृत्व म्हणून निलेश राणे यांची ओळख आहे. 2009 च्या निवडणुकीत सुरेश प्रभूंसारख्या नेत्याला निलेश राणे यांनी धूळ चारली होती. नारायण राणे यांच्या नावाच्या वलयामुळे निलेश राणे यांची दाकद वाढलेली वाटते. मात्र यावेळी काँग्रेसपेक्षा स्वाभिमानच्या तिकिटावर उमेदवारी लढवणार असल्याने निलेश राणेंसमोर वेगळं आव्हान असणार आहे.






कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरही शिवसेनेवरचं प्रेम कोकणाने कमी केलं नाही. आजवरच्या इतिहासात कोकण आणि शिवसेना हे समीकरण कायम आहे. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेबांवर कोकणी माणसाचं आजही प्रेम आहे.

राज्यात युती झाली तर भाजपची भूमिका महत्त्वाची असणार आहे. भाजपच्या तिकिटावरुन खासदार झालेल्या नारायण राणेंच्या मुलाच्या बाबतीत शिवसेनेला काटशह देण्यासाठी भाजप राणेंना छुपा पाठिंबा देऊ शकते. तर युती झाली नाही तर भाजप सुरेश प्रभू यांना उमेदवारी देऊन 2009 सालातील उट्टे काढता येते का हे पाहिल. तर दुसरीकडे नारायण राणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी जवळीक करुन आहेत. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष असे तिघे एकत्र येत युतीच्या उमेदवाराला टक्कर  देतील. युतीच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी आपला उमेदवार इथून उभा करणार नाही. भाजपच्या गोटातून खासदार झालेल्या नारायण राणेही अशा वेळी राजीनामा देऊन निवडणूक रिंगणात उतरु शकतात. पण ही शक्यता कमी असली तरी राजकीय डावपेचांमुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा निवडणूक गाजणार एवढं मात्र नक्की आहे.



2014 च्या लोकसभेला मिळालेली विधानसभा निहाय मते



2014 मध्ये शिवसेनेकडून शिवसेना सचिव विनायक राऊत यांना 4 लाख 93 हजार 88 मतांनी विजयी

2009 मध्ये काँग्रेसकडून निलेश नारायण राणे यांना 3 लाख 53 हजार 915 मतांनी विजयी