मुंबई : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या नविनचंद्र बांदिवडेकर यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. बांदिवडेकरांचा 'सनातन संस्थे'शी संबंध असल्याचा आरोप केला जात आहे.


'नालासोपारा बॉम्ब ब्लास्ट केसचा आरोपी असलेल्या वैभव राऊतला सोडवण्यासाठी नविनचंद्र बांदिवडेकरांनी मोर्चा काढला होता' असा आरोप केला जात आहे. बांदिवडेकर भंडारी समाजाचे नेते असून 'सनातन संस्थे'चे कोकण विश्वस्त आहेत, असा दावा केला जात आहे.

'हिंदुत्वाच्या रक्षणासाठी वैभव राऊत झटला' असं बांदिवडेकरांचं वक्तव्य 'दैनिक सनातन प्रभात'मध्ये छापून आल्याचं म्हटलं जात आहे. नविनचंद्र बांदिवडेकर यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी हात जोडून पक्षात बोलावलं आणि पक्षाने त्यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची उमेदवारी दिल्याचा दावाही केला जात आहे.

'नविनचंद्र बांदिवडेकर यांचा सनातन संस्थेशी काहीही संबंध नाही. सनातनच्या कोणत्याही कार्यात त्यांचा सहभाग नाही. बांदिवडेकर सनातनची विचारधारा आणि त्यांच्या समर्थकांच्या विरोधात आहेत आणि हा विरोध पुढेही कायम राहील' असा दावा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ट्वीट करुन रत्नागिरीचा उमेदवार बदलण्याची मागणी मित्रपक्ष काँग्रेसकडे केली आहे. या ट्वीटमध्ये आव्हाडांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार आणि राहुल गांधी यांना टॅग केलं आहे.

https://twitter.com/Awhadspeaks/status/1108717800674283521

बांदिवडेकर यांचे सनातन संस्थेशी संबंध असल्याबाबत हायकमांडपर्यंत माहिती गेली. याबाबत हायकामंडने नाराजी व्यक्त केल्यामुळे सखोल चौकशी करुन कारवाई करण्याची सारवासारव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.