मुंबई : आगे आगे देखो होता है क्या? असं म्हणणाऱ्या भाजपनेत्यांच्या सूचक विधानं प्रत्यक्षात उतरताना दिसत आहेत. राज्यातील मोठ्या राजकीय घराण्यांना भाजपात घेऊन मोठे धक्के दिल्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे.  विखे पाटील, मोहिते पोटील घराण्यांपाठोपाठ माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांचे घराणेही  भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे.


वसंतदादा पाटलांच्या परिवाराशी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील संपर्कात आहेत. सांगलीची जागा शेतकरी संघटनेला देण्यास दादा कुटुंबाचा आक्षेप आहे.  सांगलीच्या जागेवरुन काँग्रेसमध्ये घमासान सुरू आहे. काँग्रेसची परंपरा असलेली सांगलीची जागा द्यायला अनेक जणांचा विरोध आहे. दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींना विदर्भातील देण्यात येणार आहे, अशीही चर्चा आहे.

दरम्यान, मी भाजपात जाणार ही चर्चा खोटी आहे. मला तशी गरजही नाही, आजिबात भाजपमध्ये जाणार नाही. आमचे सगळ्या पक्षाशी संबंध चांगले आहेत. आमचे राजू शेट्टींशी चांगले संबंध आहेत.  आमचं घर कधीच काँगेस सोडू शकणार नाही. आम्ही लोकांसाठी काम करतो. आम्ही सगळे एकत्र आहोत, असे प्रतीक पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.

कोण आहेत प्रतिक पाटील?
काँग्रेसचे सांगलीचे माजी खासदार
माजी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री
काही काळ केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्रीपदाची जबाबदारी
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू
गांधी घराण्याशी निष्ठावान म्हणून ओळख
2014 च्या निवडणुकीत भाजपच्या संजय पाटील यांच्याकडून पराभव

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर
दुसरीकडे, काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असून त्यांना बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढण्यासाठी गळ घातली जात असल्याची माहिती आहे.  बारामती लोकसभा मतदारसंघातून स्वतः हर्षवर्धन किंवा त्यांच्या पत्नी भाजपच्या उमेदवार असू शकतात.

अजित पवार यांनी आघाडीत बिघाडी झाली तरी चालेल पण इंदापूरमधून दत्तात्रय भरणे हेच लढणार अशी भूमिका घेतल्यापासून हर्षवर्धन पाटील अस्वस्थ आहेत.  नुकताच काँग्रेसचा इंदापूरमध्ये मेळावा झाला होता. या मेळाव्याला पृथ्वीराज चव्हाण मेळाव्याला उपस्थित होते. या संपूर्ण मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबीयांवर जबरदस्त टीका करण्यात आली होती. नुकताच रणजितसिंह मोहिते पाटील यांचा भाजप प्रवेश झाल्यावरही इंदापूरमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले.

भाजपाकडून उमेदवारीचं आश्वासन मिळाल्यावरच हर्षवर्धन भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.