मुंबई : अभिनेता सलमान खान लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आपण निवडणुका लढवणार नसल्याचं स्पष्टीकरण सलमानने ट्विटरवरुन दिलं आहे. त्यामुळे लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजनांविरोधात सलमान निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा थांबल्या आहेत.


काँग्रेसच्या तिकीटावर सलमान इंदूरमधून निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं जात होतं. सुमित्रा महाजन या इंदूरमधून सलग आठव्यांदा खासदार आहेत. त्यामुळे सुमित्रा महाजन यांच्याविरोधात सलमान मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतु सलमानच्या स्पष्टीकरणामुळे या चर्चांचा धुरळा खाली बसला आहे.

'मी निवडणूक लढवणार असल्याच्या अफवा ऐकायला मिळाल्या, मात्र त्यात तथ्य नाही. त्याचप्रमाणे मी कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रचारही करणार नाहीये' असं सलमानने ट्विटरवर लिहिलं आहे.


गेल्या आठ टर्म्स भाजपकडे असलेली ही सीट खेचून आणण्यासाठी काँग्रेस जंग-जंग पछाडताना दिसत आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी यापूर्वी सलमान खानचं नाव सुचवलं होतं. नुकतंच त्याला मध्य प्रदेश पर्यटन विभागाचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केलं होतं.

सलमानचा जन्म मध्य प्रदेशचा आहे. कल्याणमल नर्सिंग होममध्ये सलमानचा जन्म झाला. त्यामुळे जन्मभूमीत सलमानला जनमत मिळेल, असा काँग्रेसचा अंदाज असल्याचं म्हटलं जात होतं.