मुंबई : राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काल अकलुजमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या पाठिंब्याने भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती.


गरवारे क्लबमध्ये रणजितसिंह मोहिते-पाटलांचा भाजपमध्ये अधिकृत पक्षप्रवेश केला आहे. यावेळी रणजितसिंह मोहिते पाटलांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.


मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षात राज्य प्रगतीपथावर नेलं : विजयसिंह मोहिते-पाटील


विधानपरिषदेमध्ये सदस्य असल्यापासून भाजपबरोबर आपुलकीचं नातं निर्माण झालं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात राज्य प्रगतीपथावर नेलं. सर्व पक्ष, गटतट बाजूला ठेवत सर्वांची कामे केली. माढा, सोलापूरमधील सिंचन प्रश्न, रेल्वेचे प्रश्न, पासपोर्ट कार्यालयाचे प्रश्नही सोडवले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे विविध रस्त्यांची कामे झाली. राष्ट्रवादीत असून कामे कशी होतात अशी टीकाही त्यावेळी आमच्यावर झाली.


कृष्णा खोरे स्थिरीकरण योजना असा एक प्रकल्प विजयसिंह मोहिते पाटलांनी मांडला होता. मात्र राष्ट्रवादीच्या काळात प्रकल्पाची चेष्टा करण्यात आली. मात्र गेल्या पाच वर्षात या प्रकल्पाला गती मिळत आहे, अशी माहिती रणजितसिंह मोहिते पाटलांनी दिली.


राजकारण हे शेवटच्या माणसाला लाभ देणारे असले पाहीजे. आम्हाला तुमच्याबरोबर काम करण्याची संधी दिली. त्यामुळे आता पुढे तुम्ही सांगाल ते राजकारण, समाजकारण करु, असंही रणजितसिंह पाटलांनी म्हटलं.



विजयसिंह पाटलांच्या आशीर्वादने रणजितसिंह भाजपमध्ये : मुख्यमंत्री


आज राजकारणातील एक महत्त्वाचा दिवस आहे. महाराष्ट्राचे राजकारण जे मोहिते-पाटील घराण्याशिवाय पूर्ण होत नाही, ज्यांनी राज्यात ठसा उमटवला, त्याच घराण्यातील तिसरी पिढी रणजितसिंह मोहिते-पाटलांच्या भाजप प्रवेशामुळे मोठं घराणं भाजपसोबत जोडत असल्याच आनंद आहे.


माढ्यात खासदार भाजपचाच होईल, असं बोलून रणजितसिंह माढ्याचे लोकसभेचे उमेदवार असतील असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. विजयसिंह मोहिते-पाटलांच्या आशीर्वादने रणजितसिंह भाजपमध्ये आले असल्याचं सांगितलं. तसेच पुढची चर्चा आम्ही विजयसिंह मोहिते पाटलांसोबत करु असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. विजयसिंह तिकडे आहेत की इकडे आहेत यापेक्षा ते मनाने इकडेच आहे, असं सूचक विधान मुख्यमंत्र्यानी केलं.


विजयासाठी नवीन लोकांना संधी दिली पाहिजे : गिरीश महाजन


राज्यातील मोठी घराणी आता भाजपवर विश्वास दाखवत आहेत. त्यामुळे भविष्याचा वेध घेऊन अनेक मोठे नेते भाजपमध्ये येत आहेत. विजयासाठी नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. तसेच येत्या आठवडाभरता भाजपमध्ये आणखी लोक येतील, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.


रणजितसिंह भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी माढ्यात हा मोठा धक्का मानला जात आहे. माढ्यातील लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीला जड जाण्याची शक्यता आहे.



रणजितसिंह मोहिते पाटलांचा कार्यकर्त्यांशी संवाद


काल (मंगळवारी) अकलूजमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना रणजितसिंह मोहिते पाटलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमनं उधळली. कृष्णाभीमा स्थिरीकरण हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न सोडवण्याची ताकद फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आहे, असं रणजितसिंह म्हणाले होते.


याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील यांचंही मोहिते-पाटलांनी कौतुक केलं. यावेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी रणजितसिंह यांच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला.


भाजपमध्ये प्रवेश करायचा का? असा प्रश्न रणजितसिंह यांनी विचारताच हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमुखाने घोषणा देत भाजप प्रवेश करण्याच्या निर्णयाला समर्थन दर्शवलं होतं.



विजयसिंह मोहिते-पाटील राष्ट्रवादी सोडणार नाही : तटकरे


रणजितसिंह मोहिते पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयानंतर विजयसिंह मोहित पाटीलही भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आणि समंजस नेते आहेत. त्यामुळे ते राष्ट्रवादी सोडून जाणार नाहीत, असा विश्वास राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंनी व्यक्त केला आहे.


राष्ट्रवादीत विजयसिंह मोहिते पाटलांवर अन्याय होत आहे का याबाबत आपल्याला काहीही कल्पना नाही. मी सध्या रायगडाच्या निवडणुकीत व्यस्त असल्याने मोहिते पाटील यांच्या निर्णयाबाबत आपल्याला काहीच माहित नसल्याचेही तटकरे यानी सांगितले. मात्र आता विजयसिंह मोहिते पाटील काय भूमिका घेतात याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.