मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकांसाठी रणमैदान तयार झालंय. सहाव्या जागेवर नेमकं कोण सिक्सर मारणार याची उत्सुकता आहे. राज्यसभेच्या निवडणुकीची पद्धत ही एखाद्या बुद्धिबळाच्या पटासारखी असते. ज्यात पहिल्या पसंतीच्या मतांसोबतच दुसऱ्या पसंतीचीही मतं निर्णायक ठरतात. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल ही मतांची आखणी कोण व्यवस्थित करतं यावरच अवलंबून असणार आहे. 


राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात
महाविकास आघाडीचे 4 तर भाजपकडून 3 असे सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे 3 जून. तोपर्यंत कुणी माघार घेतली नाही तर निवडणूक होणार हे आता अटळ आहे. त्यामुळे साहजिकच राज्यसभेसाठी मतांची आकडेमोडही सुरु झालीय. सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात रस्सीखेच होणार हे उघड आहे. 


राज्यसभेची निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीची किमान 42 मतं आवश्यक आहेत. विधानसभेतलं आमदारांचं संख्याबळ पाहिलं तर भाजपचे 2, शिवसेनेचा 1, राष्ट्रवादीचा 1, काँग्रेसचा 1 खासदार आरामात निवडून येऊ शकतो. भाजपला आपला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी तर महाविकास आघाडीला आपला चौथा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. 


दोन कोल्हापूरकरांमध्ये लढत
भाजपकडून पीयुष गोयल, डॉ. अनिल बोंडे, तर शिवसेनेकडून संजय राऊत, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल, काँग्रेसकडून इमरान प्रतापगढी यांना पहिल्या पसंतीच्या मतांची कमतरता भासणार नाही असं दिसतंय. त्यामुळे सहाव्या जागेसाठी भाजपचे धनंजय महाडिक, सेनेचे संजय पवार या दोन कोल्हापूरकरांमध्येच लढत होणार असं दिसतंय. 


राज्यसभेचा खेळ या मतांवर ठरणार 



  • राज्यसभेसाठी मतदान करताना आमदारांना उमेदवारांना 1,2,3,4... असे पसंतीक्रम द्यावे लागतात.

  • महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर पहिल्या पसंतीची किमान 42 मतं ज्या उमेदवाराला मिळतील तो पहिल्याच राऊंडमध्ये विजयी ठरतो.

  • पण 42 पेक्षा कमी मतं मिळाली तर मग दुसऱ्या पसंतीची मतं मोजली जातात.

  • सध्याच्या स्थितीत धनंजय महाडिक, संजय पवार यांना पहिल्या पसंतीची साधारण 25 ते 30 च्या आसपास मतं मिळतील असं दिसतंय. पण ती विजयासाठी पुरेशी नााहीत.

  • कोण विजयी होणार याचा फैसला दुसऱ्या पसंतीच्या मतांवर होऊ शकतो.

  • त्यामुळे पहिल्या पसंतीची मतं ठरवतानाच दुसऱ्या पसंतीच्या मतांचीही रणनीती विजयात महत्वाची ठरणार आहे. 


शिवसेना आमदार रमेश लटके यांचं नुकतंच निधन झालंय. तर भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. शिवाय राष्ट्रवादीचे नवाब मलिक, अनिल देशमुख हे कोठडीत आहेत. एकेक मत निर्णायक असल्यानं त्यांनाही मतदानाच्या परवानगीसाठी अर्ज केले जातील. 


राज्यसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या आमदारांना आपलं मत पोलिंग एजंटला दाखवावं लागतं. पण तसं बंधन अपक्ष आमदारांना नाहीय. महाविकास आघाडीची शक्तीपरीक्षा या राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं होणार आहे. पहिल्या पसंतीसोबतच दुसऱ्या पसंतीच्या मतांची आखणी जो व्यवस्थित करेल तोच या निवडणुकीत बाजी मारणार हे उघड आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :