मुंबई: राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आता शिवसेना आणि भाजप आमने-सामने आले आहेत. भाजपने त्यांचा तिसरा उमेदवार म्हणून कोल्हापूरच्या धनंजय महाडिक यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे सहा जागांसाठी सातवा उमेदवार रिंगणात आल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची आशा मावळली आहे. 


सहा जागेसाठी सात उमेदवार
महाराष्ट्रातून यावेळी राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी एक जागा लढणार आहेत. आतापर्यंत शिवसेनेने दोन तर भाजपने दोन उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानंतरही कोल्हापूरच्या धनंजय महाडिकांना उद्या मुंबईत या असा संदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आला आहे. त्यांचाही अर्ज भाजपच्या वतीने दाखल करण्यात येणार आहे. 


धनंजय महाडिक हे माजी खासदार आहेत. राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर ते 2014 साली निवडून आले होते. 2019 सालच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर धनंजय महाडिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना भाजपचे प्रदेश उपाध्यक्षपद देण्यात आले. 


कोण आहेत धनंजय महाडिक?


धनंजय महाडिक हे एकेकाळचे काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे पुतणे आहेत. महादेवराव महाडिक यांचा त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर एकहाती वर्चस्व होतं. त्याचा फायदा धनंजय महाडिकांना झाला आणि महाविद्यालयीन वयापासूनच ते सामाजिक कार्यात सक्रिय राहिले


 युवा शक्तीच्या माध्यमातून तरुणांचे संघटन


धनंजय महाडिक यांनी युवा शक्तीच्या माध्यमातून तरुणांचे संघटन केलं. त्या माध्यमातून जिल्हाभर त्यांनी युवकांचे जाळे उभारले. 2004 साली धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून लोकसभा लढले होते. पण त्यावेळी राष्ट्रवादीच्या सदाशिवराव मंडलिक यांच्याकडून त्यांना केवळ 12 हजारांनी पराभर पत्करावा लागला. त्यानंतर धनंजय महाडिक यांनी आपले सामाजिक आणि राजकीय कार्य सुरूच ठेवलं. 


राष्ट्रवादीमध्ये प्रवेश


धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2014 साली देशभरात मोदी लाट असताना देखील धनंजय महाडिक खासदार म्हणून लोकसभेत पोहोचले. पण खासदार झाल्यानंतर त्यांचे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांशी काही पटलं नाही. दरम्यानच्या काळात ते मुंबई-दिल्लीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत राहणारे धनंजय महाडिक हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मात्र भाजपच्या चंद्रकांत पाटील यांच्यासोबत जुळवून घ्यायचे. याचाच फटका त्यांना 2019 सालच्या निवडणुकीत बसला आणि त्यांचा शिवसेनेच्या संजय मंडलिक यांच्याकडून पराभव झाला. 


भाजपमध्ये प्रवेश2


019 सालच्या निवडणुकीआधीच धनंजय महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी चंद्रकात पाटील यांनी प्रयत्न केला होता. अखेर तो योग निवडणुकीनंतर जुळून आला आणि धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपने त्यांना प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली.