मुंबई: राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आता कोल्हापूरचे दोन मल्ल झुंजण्याची शक्यता आहे. पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता भाजपच्या तिसऱ्या जागेसाठी आणि एकूणात सहाव्या जागेसाठी कोल्हापूरच्या धनंजय महाडिकांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
धनंजय महाडिक यांना सोमवारी मुंबईमध्ये या असा संदेश भाजपने दिला आहे. त्यामुळे उद्या पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांच्यासोबत आता धनंजय महाडिक आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
भाजपकडून राज्यसभेच्या जागांसाठी जाहीर करण्यात आलेल्या यादीत धनंजय महाडिक यांचे नाव नाही. तरीही त्यांना आता संधी देण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या त्यांना मुंबईत येण्याचा संदेश धाडण्यात आला आहे.
भाजपकडून राज्यसभेसाठी दोन जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. माजी मंत्री अनिल बोंडे आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने विविध राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी नावांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार आणि हरियाणा या राज्यांतील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
मध्य प्रदेशातून कविता पाटीदार यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. निर्मला सीतारामन आणि जगेश यांना कर्नाटकमधून उमेदवारी देण्यात आली आहे. पियुष गोयल आणि अनिल सुखदेवराव बोंडे यांना महाराष्ट्रातून उमेदवारी जाहीर झाली आहे. राजस्थानमधून घनश्याम तिवारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात पक्षाने सुरेंद्र सिंह नागर, बाबुराम निषाद, दर्शना सिंह आणि संगीता यादव यांना उमेदवारी दिली आहे.
देशातल्या 15 राज्यातील 57 जागांवर राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. या सर्व 57 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होत आहे. 57 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 21 जून ते 1 ऑगस्ट यादरम्यान संपत आहे. राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तयारी सुरु केली आहे. ज्या महत्त्वाच्या नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे, त्यामध्ये काही दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे.